पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा साठा व ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 05:44 PM2020-04-01T17:44:18+5:302020-04-01T17:45:32+5:30
नागरिकांकडून अधिकचे पैसे घेऊन ब्लॅक मार्केटिंग देखील केले जात असल्याच्या तक्रारी
पुणे : सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने काही व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. तसेच अधिकचे पैसे घेऊन ब्लॅक मार्केटिंग देखील केले जात असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या तक्रारींची वेळीच दखल घेत साठेबाजी व ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात खास पथके नियुक्त केली आहेत. तसेच अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्याकरीता परिमंडळनिहाय 11 पथकांव्दारे दररोज तपासणी करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधे यांची सद्यस्थितीत एकूण 27 हजार 210 दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत.
सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याकरीता मार्केट कमिटी, होलसेलर व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन व्यापारी महासंघ यांच्याशी समन्वय ठेवण्यात येत असून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होईल, याची दक्षता घेण्यात येत आहे. काही जिल्हाबाह्य व राज्यबाह्य वाहतुकीने येणारी अन्नधान्य वाहने पोलीसांकडून अडविण्यात येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र 92 गाडयांची काल आवक झाली आहे.
दरम्यान लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवांकरीता पेट्रोल, डिझेल तुटवडा होऊ नये याकरिता पुढील कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांकरिता पेट्रोल व डिझेल साठा राखीव ठेवण्यात यावा, असे पेट्रोलियम कंपन्यास कळविण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवांकरिता लागणा-या मनुष्यबळाला पुरवठा कार्यालयातर्फे ओळखपत्र देण्यात येत असून 4096 ओळखपत्र विविध आस्थापनांना वितरित करण्यात आलेली आहेत.
‐-------
रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी पुढील दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. टोल फ्री क्रमांक 1077
मदत केंद्र क्रमांक 020-26123743 (सकाळी 8.00 ते रात्री 8.00)
मोबाईल क्रमांक 9405163924