मोठी बातमी : पुणे शहरात नियमांचे पालन न करणाऱ्या वैशाली, गुडलकसह ४७ हॉटेलवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 08:43 PM2021-02-22T20:43:44+5:302021-02-22T20:44:21+5:30
शहरात सोमवारपासून रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू
पुणे : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जाहिर केलेल्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या, शहरातील वैशाली, गुडलक हॉटेलसह ४७ हॉटेल्सवरपुणे महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.
फर्ग्युसन, जंगली महाराज रस्त्यांसह शहरातील अन्य भागातील १७ फेब्रुवारीपासून सोमवारपर्यंत करण्यात आलेल्या कारवाई या ४७ हॉटेलकडून १ लाख ५१ हजार ९५० रूपये दंड वसुली करण्यात आली आहे. शासनाने निर्देष दिल्यानुसार, हॉटेलमध्ये दोन टेबलमध्ये अंतर न ठेवणे, आसन व्यवस्था एका आड एक नसणे, सॅनिटायझरचा वापर न करणे आदींबाबत ही कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, प्रत्येक हॉटेलवर प्रत्येकी पाच हजार रूपये दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांनी दिली़
दरम्यान, मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांकडून १७ फेब्रुवारीपासून १ लाख ५५ हजार ५० रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. शहरात सोमवारपासून रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने, आता या कारवाईचे स्वरूप आणखी वाढले जाण्याची शक्यता आहे़.त्यातच या कारवाईचे अधिकारी हे सर्व आरोग्य अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले गेले असल्याने आता पोलिसांसह महापालिकेचे तपासणी पथकाचाही वॉच सर्वांवर राहणार आहे.
----------------------------------