Pune Mumbai Expressway | पुणे-मुंबई महामार्गावर शेकडो भरधाव वाहनांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 09:11 IST2023-01-02T09:10:08+5:302023-01-02T09:11:21+5:30
काही वाहनांचा वेग प्रतितास १६० असल्याचेही आढळून आले...

Pune Mumbai Expressway | पुणे-मुंबई महामार्गावर शेकडो भरधाव वाहनांवर कारवाई
पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गासह पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर परिवहन विभागाने डिसेंबर महिन्यात मर्यादेपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या ६६० वाहनांवर कारवाई केली. काही वाहनांचा वेग प्रतितास १६० असल्याचेही आढळून आले. महामार्गावर अपघात का होतात, याचे उत्तरही यावरून मिळते.
अपघात होऊ नयेत, लोक मृत्युमुखी पडू नयेत यासाठी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, नागरिकांनी याचे भान ठेवावे, असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले. महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फक्त अपघात रोखण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अति वेग, डुलकी लागणे, लेन कटिंग अशा मानवी चुकांमुळे महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे अनेकदा समोर आले. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने एक्स्प्रेस वेवर वाहनाची वेगमर्यादा १०० किमी प्रतितास आणि घाटात ५० किमी प्रतितास निश्चित केली आहे. पण परिवहन विभागाने कारवाई दरम्यान अनेक वाहनांचा वेग १६० ते १८० किमी प्रतितास एवढा असल्याचे समोर आले आहे.