वर्षभरात केवळ एक हजार खासगी बसवर कारवाई; ७२ लाख रुपयांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:26 IST2024-12-21T12:24:52+5:302024-12-21T12:26:03+5:30
पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गेल्या वर्षभरात साडेपाच हजार बसची तपासणी केली आहे. त्यामध्ये नियमांचे पालन न ...

वर्षभरात केवळ एक हजार खासगी बसवर कारवाई; ७२ लाख रुपयांचा दंड वसूल
पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गेल्या वर्षभरात साडेपाच हजार बसची तपासणी केली आहे. त्यामध्ये नियमांचे पालन न केल्यामुळे १ हजार ६७ बसवर कारवाई करत ७२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पुणे आरटीओकडून खासगी बस तपासणी मोहीम हाती घेतली जाते. त्यामध्ये बसचे फिटनेस, प्रवासी संख्या, विमा, जास्त भाडे, प्रवासी बसमध्ये मालवाहतूक अशा प्रकारची तपासणी केली जाते. नियमांचे पालन न केल्यास बसवर कारवाई केली जाते. आरटीओची वायुवेग पथके वेगवेगळ्या भागात जाऊन ही कारवाई करतात. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत आरटीओकडून साडेपाच हजार बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक हजार ६७ बस दोषी आढळल्या आहेत. त्यांच्यावर ७२ लाख ४३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातून दररोज विविध भागातून दीड हजार खासगी बस धावतात. या बसमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. या बस रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. तसेच, या बस चालकांकडून अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केले जाते. पण, त्याकडे ना वाहतूक पोलिसांचे लक्ष असते ना आरटीओचे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. आरटीओची वायुवेग पथके सतत कारवाई करत असतात. पण, या पथकाला वर्षभरात फक्त पाच हजारच बस तपासता आल्याचे दिसून येत आहे.