सुप्यात युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दुकानांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:50 PM2024-07-17T22:50:02+5:302024-07-17T22:50:44+5:30
या कारवाईची माहिती समजताच काही कृषी दुकानदार आपआपली दुकाने बंद करुन निघून गेले.
सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथे युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दोन दुकानांवर कृषी अधिकाऱ्यांच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या दोन दुकानातुन सुमारे ४०३ युरिया पिशव्यांचा साठा आढळून आला. सुपे येथील काही दुकानदार युरियाची कृत्रीम टंचाई करित असल्याची तक्रार शेतकऱ्यांच्यावतीने कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी बुधवारी ( दि. १७ ) सुप्यातील कृषी दुकानावर धाडी टाकल्या. त्यात येथील मोरया कृषी सेवा केंद्र आणि महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र या दोन दुकानातुन सुमारे ४०३ युरियाच्या पिशव्यांचा साठा आढळून आला.
या कारवाईची माहिती समजताच काही कृषी दुकानदार आपआपली दुकाने बंद करुन निघून गेले. मागील एक महिन्यापासून युरियाची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी तालुका कृषी विभागाकडे केल्या होत्या. मात्र दुकानदारांवर अद्याप कारवाई होत नव्हती. युरिया उपलब्ध झाला तरी एक दोन दिवसात साठा संपला असल्याचे दुकानदार जाहीर करित होते. तर काही शेतकऱ्यांना जादा दराने युरिया देण्याचा प्रकार घडत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील दोन ते चार दिवसांपासून युरिया मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे येथील शेतकरी राजकुमार लव्हे यांनी थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांनाच फोन लावुन कृत्रीम टंचाई होत असल्याची तक्रार केल्याने ही धडक कारवाई झाली.
दरम्यान तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या कि, आज ( बुधवारी ) सुप्यात युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दोन दुकानदारांवर कारवाई केली आहे. मोरया कृषी सेवा केंद्रात २१६ पिशव्या युरिया तर महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र यांच्याकडे १८७ मिळुन सुमारे ४०३ युरिया पिशव्यांचा अतिरिक्त साठा आढळुन आला. या दुकानदारांनी तरतुदीचे उल्लंगन आणि नियमाप्रमाणे खते वाटप न करणे या कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यानुसार येथील दुकानांचा स्थळ पंचनामा करुन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय पाचोळे यांच्याकडे अहवाल देणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असे बांदल यांनी सांगितले. आजच त्या दुकानातील युरियाचा साठा जप्त करणार होते. मात्र शेतकऱ्यांची टंचाई होऊ नये ही खबरदारी घेऊन दुकानदाराला तातडीने युरियाची विक्री करण्यास सांगितली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरीत युरिया उपलब्ध झाला.