भुसार बाजारातील सहा व्यापाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:13+5:302021-05-10T04:10:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केट यार्डात कडक नियमावली लागू केली आहे. या नियमांचे उल्लंघन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केट यार्डात कडक नियमावली लागू केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भुसार बाजारातील सहा व्यापाऱ्यांच्या विरोधात पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कडक कारवाई केली. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून तब्बल ३५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार आवारात नियमावली लागू केली आहे. खरेदीदारांची गर्दी होऊ नये म्हणून सूचना दिल्या आहेत. बाजार आवाराच्या कामकाजाची वेळ कमी केली आहे. भुसार बाजार परिसरातील बालाजी ट्रेडर्स, न्यू बालाजी ट्रेडिंग कंपनी, ओसिया ट्रेडिंग कंपनी, बजरंग ट्रेडिंग कंपनी, सिंघल ट्रेडिंग कंपनी, बालाजी ट्रेंडिग कंपनी या व्यापारी पेढींविरोधात बाजार समितीच्या पथकाने कारवाई केली. प्रशासक मधुकांत गरड यांच्या सूचनेनुसार भुसार विभागप्रमुख नितीन रासकर यांनी कारवाई केली. मार्केट यार्डातील किरकोळ दुकानांमुळे बाजार आवारात गर्दी होत आहे़ खरेदीच्या वेळी यापूर्वी कोणत्याही प्रकारचे नियम तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. याबाबत दुकानदारांना अनेकवेळा सूचना दिल्या होत्या. काही वेळा दुकानेही बंद केली होती. मात्र, वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने बाजार समिती प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे़ यापुढे दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही बाजार समिती प्रशासनाने दिला आहे.