बारामतीतील सांगवीत वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या; वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 12:44 PM2021-06-25T12:44:42+5:302021-06-25T12:45:11+5:30
बारामती पोलीस पथकाची कामगिरी, साडे तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त
बारामती (सांगवी ): फलटण तालुक्यातून बारामती तालुक्यात वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. बारामती पोलीस पथकाने बारामती तालुक्यातील शिरवली येथे अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळया आहेत.
या कारवाई दरम्यान वाळूसह ३ लाख ५२ हजार रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात चोरीसह सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बापूराव मदने (रा. सांगवी, ता. फलटण,जि. सातारा ), प्रभू बसपराव म्हेत्रे (रा. सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शिवाजी कर्चे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी (दि. २२) पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर भुजबळ यांना शिरवली ते माळेगाव या रस्त्याने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत सापळा रचला. यावेळी समोरून ट्रॅक्टरला दोन ट्रेलर जोडलेले येताना दिसले. या दोन्ही ट्रेलरमध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू होती. दरम्यान चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याचे नाव विचारले असता त्याने सुरेश मदने आणि मालकाचे नाव प्रभू म्हेत्रे असल्याचे सांगितले.
वाळू कुठून आणली याची चौकशी केल्यावर फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील ओढ्यातून ही वाळू काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणच्या वाळू उपशाचा कोणताही लिलाव झालेला नाही. या कारवाईत पोलिसांनी २ लाख रुपयांचा ट्रॅक्टर दोन ट्रेलर व वाळू असा ३ लाख ५२ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.