ट्रकचालकांना लुटणारी टोळी गजाआड, रांजणगाव पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:36 PM2018-09-30T23:36:29+5:302018-09-30T23:36:47+5:30
रांजणगाव एमआयडीसीमधील ज्योतून कंपनीजवळच्या मोकळ््या पटांगणात रात्रीच्या सुमारास थांबलेल्या ट्रेलर (एनएल ०१ एबी १४७५) यावरील चालक सलीम सरजित खान
रांजणगाव गणपती : येथील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये रात्रीच्या सुमारास येणाऱ्या परराज्यातील वाहनचालकांना मारहाण करून लुटणारी टोळी रांजणगाव पोलिसांनी गजाआड केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
रांजणगाव एमआयडीसीमधील ज्योतून कंपनीजवळच्या मोकळ््या पटांगणात रात्रीच्या सुमारास थांबलेल्या ट्रेलर (एनएल ०१ एबी १४७५) यावरील चालक सलीम सरजित खान (वय २५, रा. हरियाना) यास आरोपी सचिन अशोक शिंदे (वय २४), सचिन गोपालराव मनोहर (वय २६, सध्या रा. पाचंगेवस्ती, ढोकसांगवी) व चंद्रकांत रवींद्र थडके (वय २२, रा. यशइन चौक, कारेगाव) यांनी तू आमचे घर पाडले, असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून जबरदस्तीने खिशामधील ५ हजार ७०० रुपये चोरून घेऊन आणखी २० हजार रुपये दे, असे म्हणून खंडणी मागितली होती. याप्रकरणी वरील आरोपींना सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस नाईक विनोद मोहिते, चंद्रकांत काळे, अजित भुजबळ, प्रफुल्ल भगत, पोलीस शिपाई गणेश सुतार, उमेश कुतवळ यांनी सापळा रचून पाठलाग करून पकडले आहे.
रांजणगाव एमआयडीसीमध्ये अनेक राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यातील व परराज्यातील मालवाहू ट्रक व ट्रेलर ये-जा करीत असतात. त्यांच्या चालकांना लुटीचे प्रकार पुन्हा होऊ नयेत, म्हणून पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविले असून विशेष अभियान सुरू केल्याचे यादव यांनी सांगितले.