वानवडीत आरोग्य विभागाकडून कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:14 AM2021-02-27T04:14:12+5:302021-02-27T04:14:12+5:30
वानवडीच्या सहायक आयुक्त किशोरी शिंदे, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक डी. ए. आवटी यांच्या ...
वानवडीच्या सहायक आयुक्त किशोरी शिंदे, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक डी. ए. आवटी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या कारवाईत सात दिवसांत ६० जणांवर कारवाई करत एकूण रुपये ३०,००० चा दंड वसूल केला. वानवडी, रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या प्रभाग क्र. २४, २५ व २७ मधील औद्योगिक क्षेत्र, रामटेकडी, मंगल कार्यालय, हाॅटेल, माॅल, शिवरकर रस्ता, टेन स्क्वेअर येथील दुकानदार व साळुंखे विहार रस्त्यावरील कारवाईत मास्क न वापरणाऱ्या तसेच सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या दुकानमालकांकडून दंड वसूल करण्यात आला.
सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार आरोग्य निरीक्षक मिलिंद खांदोडे, प्रदीपकुमार राऊत, सुनील घोळवे, सीमा पुजारी, राहत कोकणी व मोकादम बापू आडागळे, बागडे, आकाश धीवार यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.
चौकट
दुकानात ग्राहक नाही तर मास्क का वापरू
वानवडीतील केपीसीटी इमारतीमध्ये असलेल्या गोल्ड सिटी व कोटक महिंद्रा बँकेत कारवाईसाठी गेलेल्या पालिका आरोग्य निरीक्षक व कर्मचारी यांना या दुकानदारांनी अरेरावी केली. तसेच ग्राहक नाहीत तर मास्क का वापरु असे बोलून दंड भरण्यास नकार दिला, असे आरोग्य निरीक्षक यांनी सांगितले. या वेळी जास्त ताणतणाव निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रबोधन करण्यात आले व कोविड १९ संदर्भात नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या.
फोटो : कारवाई करताना सहा. आयुक्त किशोरी शिंदे व आरोग्य निरीक्षक, कर्मचारी.