भोरला अतिक्रमणांवर हातोडा : कारवाईला मिळाला मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 02:05 PM2019-07-19T14:05:49+5:302019-07-19T14:17:39+5:30
राजवाड्याच्या धोकादायक भिंतीजवळ बेकायदेशीर टाकलेल्या टपºया व घरांची अशी १९ अतिक्रमणे काढण्यात आली.
भोर : भोर शहरातील मुख्य बाजारपेठ आणि आणि इतर ठिकाणांवरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत होती. या अतिक्रमणांवर भोर नगरपालिकेने गुरुवारीकारवाई करत राजवाडा चौकातील राजवाड्याच्या धोकादायक भिंतीजवळ बेकायदेशीर टाकलेल्या टपऱ्या व घरांची अशी १९ अतिक्रमणे काढण्यात आली. टप्प्याटप्प्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भोर नगरपलिकेने अतिक्रमण केलेल्या लोकांना नोटीसा दिल्या होत्या. त्यामुळे आपआपली अतिक्रमणे नागरिकांनी स्वत:हून काढली. गुरुवारी सकाळपासून भोर शहरातील नगरपलिकेजवळच्या अग्निशामन केंद्राच्या जागेतील दोन पक्की घरे पाडून अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राजवाडा चौकातील राजवाड्याची इमारत धोकादायक झाली असून भिंत पडल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या इमारतीखाली असलेल्या १२ टपऱ्या काढण्यात आल्या. त्याचबरोबर वेताळपेठ येथील एक दुकान व इतर ६ टपऱ्या अशी दोन घरे व १७ टपऱ्यावर हातोडा आज मारण्यात आला आहे.
सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी संतोष वारुळे, शाखा अभियंता संजीव सोनवणे १० आरसीपी पथकाचे पोलीस तर भोर, राजगड, सासवड पोलीस ठाण्याचे २५ पोलीस असा एकूण ३५ पोलीस बंदोबस्त आणि एक जेसीबी आणि भोर नगरपलिकेचे कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
टप्प्याटप्प्याने पोलीस बंदोबस्त मागवून एसटी स्टँड, सुभाष चौक, नगरपलिका चौक ते चौपाटीपर्यंत रस्त्याशेजारी असलेली अतिक्रमणे तसेच शेडची काढण्याचे काम पुढील काही दिवसांत करून रस्ता मोकळा करुन वाहतुकीस खुला केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी सांगितले.