रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई ; पाेलीस स्टेशनच्या बाहेरील वाहनांचे काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 07:05 PM2018-12-12T19:05:20+5:302018-12-12T19:07:25+5:30
पुणे महागरपालिका अाणि वाहतूक पाेलिसांकडून रस्त्यावरील बेवारस अाणि वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते परंतु अनेक पाेलीस स्टेशनच्या बाहेर जप्त केलेली वाहने असल्याने त्यांच्यावर कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
पुणे : गेल्या दाेन दिवसांपासून पुण्यातल्या रस्त्यांवर बेवारस असलेल्या तसेच वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर पुणे महानगरपालिका अाणि वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत अाहे. जप्त करण्यात अालेली वाहने नदीपात्रात ठेवण्यात अाली अाहेत. एकीकडे रस्त्यावर बेवारस असलेल्या वाहनांवर कारवाई हाेत असताना शहरातील विविध पाेलीस स्टेशनच्या बाहेर जप्त केलेल्या तसेच अपघात झालेल्या वाहनांवर देखील कारवाई हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
रविवारी रात्री पालिका अाणि वाहतूक पाेलिसांकडून संयुक्त माेहिम हाती घेऊन रस्त्यावरील बेवारस अाणि वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. यात शेकडाे वाहने उचलून नदी पात्रात ठेवण्यात अाली. ही कारवाई रात्री करण्यात अाली. या कारवाई दरम्यान काही वाहनांचे नुकसान झाल्याने ती नुकसान भरपाई काेण देणार असा प्रश्न नागरिकांना उपस्थित केला हाेता. तसेच कुठलिही नाेटीस न देता वाहने उचलल्याने अनेकांनी सकाळी अापले वाहन नसल्याचे पाहिल्यावर पाेलीस स्टेशनमध्ये धाव घेत गाडी चाेरीची तक्रार दाखल केली. जे लाेक ही वाहने साेडविण्यास येत अाहेत त्यांच्याकडून माेठा दंडही वसूल करण्यात अाला. यामुळे नागरिकांमध्ये कमालिची नाराजी दिसून अाली. सध्या नदी पात्रात शेकडाे चारचाकी व दुचाकी ठेवण्यात अाल्या अाहेत.
रस्त्यावरील बेवारस अाणि वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असताना शहरातील विविध पाेलीस स्टेशन बाहेरच्या वाहनांचे काय असा प्रश्न अाता नागरिक उपस्थित करत अाहेत. अनेक पाेलीस स्टेशनच्या बाहेर विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या तसेच अपघात झालेल्या गाड्या ठेवण्यात अाल्या अाहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या गाड्या तशाच पडून अाहेत. काही ठिकाणी तर या गाड्यांमुळे वाहतूकीस अडथळा देखील निर्माण हाेताे. शिवाजीनगर, वारजे, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर, लाेणी काळभाेर अशा अनेक पाेलीस स्टेशनच्या बाहेर या गाड्या अाहेत. त्यामुळे ज्या तत्परतेने नागरिकांच्या वाहनांवर कारवाई करण्यात येत अाहे. तीच तत्परता या गाड्यांवर कारवाई करताना दाखविण्यात येणार का असा प्रश्न विचारला जात अाहे.