‘त्या’ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:26 AM2018-05-08T03:26:53+5:302018-05-08T03:26:53+5:30
महापालिका प्रभाग समिती सदस्य नगरसेवकांवर शिरजोर असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने फलक काढण्याची कारवाई सुरू केली आहे. अजूनही सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत. त्यांवर कधी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी - महापालिका प्रभाग समिती सदस्य नगरसेवकांवर शिरजोर असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने फलक काढण्याची कारवाई सुरू केली आहे. अजूनही सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत. त्यांवर कधी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती स्वीकृत सदस्यांची निवड मागील आठवड्यात झाली. घटनात्मकदृष्ट्या एकही अधिकार नसणारे हे पद असताना ‘स्वीकृत नगरसेवक’ अशी जंगी जाहिरातबाजी काही सदस्यांनी केली होती. आठही प्रभागांतील प्रमुख चौकांत, रस्त्यांवर, टॉवरवर त्या त्या भागातील राजकीय कार्यकर्त्यांचे ‘सौजन्य’ स्वीकारून मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी केल्याचे दिसून आले. त्यामुळे लोकनियुक्त नगरसेवकांनाही घाम फुटला होता. राष्टÑवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या फ्लेक्सवर त्वरित कारवाई करणाऱ्या प्रशासनाने या स्वीकृत प्रभाग सदस्यांचे फ्लेक्स काढण्याबाबत जरा जास्तच उदासीनता दाखविल्याचे लोकमतने उघडकीस आणले.
शुक्रवारच्या ‘हॅलो’मध्ये या विषयी वृत्त प्रकाशित करून या सदस्यांची पोलखोल केली होती. शहरवासीयांसमोर वास्तव मांडले होते. तसेच या अनधिकृत फ्लेक्सबाजीला प्रशासनाचे अभय असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. हे वृत्त प्रकाशित होताच महापालिका प्रशासनाने सर्व प्रभागांतर्गत कारवाई सुरू केली. आकुर्डीतील संभाजी चौक, म्हाळसाकांत चौक, पिंपरीतील लिंक रस्ता चौक फ्लेक्स तातडीने काढले.
दरम्यान, सांगवी, पिंपळे सौदागर, भोसरी, रुपीनगर परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रार करूनही फ्लेक्स काढले जात नाहीत. प्रभाग कार्यालयातील अनधिकृत बांधकाम विभागातील अधिकाºयांचे अभय असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
विनापरवाना फ्लेक्सवर कारवाई करावी, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे सर्व प्रभागाच्या प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. यापूर्वी काही भागातील फ्लेक्स काढले असून, उर्वरित भागातही कारवाई केली जाणार आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परवानगी घेऊन फ्लेक्स उभारावेत.
- विजय खोराटे, सहायक आयुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग