रुपीने तारण नसलेल्या मालमत्तांवर आणली टाच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 02:33 PM2019-12-20T14:33:30+5:302019-12-20T14:41:48+5:30
२३० थकबाकीदारांवर कारवाई : जामीनदारांच्या मालमत्ताही रडारवर
विशाल शिर्के-
पुणे : थकबाकीदारांकडून कर्ज वसुलीसाठी रुपी बँक प्रशासकीय मंडळाने थकबाकीदार व जामीनदारांच्या तारण नसलेल्या मालमत्तांची शोधमोहीम हाती घेतली आहे. अशा तब्बल ६१.२३ कोटी रुपयांच्या २३० मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. तर, तारण असलेल्या मालमत्तांसह तब्बल ९५.३३ कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. सहकार क्षेत्रात तारण नसलेली मालमत्ता शोधून कारवाईची अलीकडच्या काळातील ही मोठी घटना मानली जात आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे रुपी बँकेवर २०१३ मध्ये आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदार-ठेवीदारांना एक हजार रुपयेच काढण्याची मुभा आहे. सक्षम बँकेत रुपीचे विलीनीकरण व्हावे या साठी बँकेकडून प्रयत्न सुरू आहेत. मार्च २०१९ अखेरीस बँकेने ११ कोटी २० लाख रुपयांची कर्ज वसुली केली होती. तसेच, बँकेस १० कोटी ५९ लाख रुपयांचा परिचलनात्मक नफादेखील झाला. मार्च २०२० पर्यंत ४० कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे उद्दिष्टठेवले आहे.
कर्ज वसुलीसाठी थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच आणणे, बेपत्ता कर्जदार-जामीनदारांवर फौजदारी कारवाई करणे, कर्जबुडव्यांची नावे अन्य बँकांना कळविणे आणि मालमत्तांचे लिलाव पुकारणे अशी कार्यवाही करण्यात येत आहे. याशिवाय कर्जाला पुरेसे तारण नसल्यास थकबाकीदारांच्या इतर मालमत्ता शोधून त्या जप्त करण्यात येत आहेत.
बँकेने ९ थकबाकीदारांना हेतूपुरस्सर कर्जबुडवे घोषित केले असून, ८ जणांविरोधात फौजदारी कारवाई सुरु केली आहे. तसेच, कर्ज वसुलीसाठी थकबाकीदारांची मालमत्ता ताब्यात घेणे, लिलाव करण्याची कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह सोसायटीज अॅक्ट-१९६० (एमसीएस) व सिक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन आॅफ फायनान्शियल असेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट आॅफ सिक्युरिटीज इंटरेस्ट अॅक्ट २००२ (सरफेसी अॅक्ट) नुसार ७३ जणांवर कारवाई करण्यात येत आहे. बँक प्रशासनाने जवळपास ३०० हून अधिक कर्जदार आणि जामीनदारांच्या मालमत्तांचा शोध घेतला आहे. त्यातील ७८ थकबाकीदारांच्या ६३ कोटी २५ लाख १५ हजार रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. या शिवाय १७ थकबाकीदारांची डी मॅट खाती देखील शोधली आहेत.
.........
रुपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) २१ फेब्रुवारी २०१३ मध्ये निर्बंध घातले आहेत. वेळोवेळी बँकेच्या निर्बंधांमध्ये वाढदेखील केली आहे. नुकतीच २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत निर्बंध वाढविले आहेत. या काळात बँक प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे बँकेच्या आर्थिक स्थितीत भरीव सुधारणा झाली असल्याचे निरीक्षण आरबीआयने २ डिसेंबर २०१९च्या पत्रामधे नोंदविले आहे.
........
रुपीने मालमत्ता केली जप्त
महसूल विभाग, प्राप्तिकर विभाग आणि लेखापाल संघटनेकडे थकबाकीदार आणि जामीनदारांच्या मालमत्तेची माहिती घेतली जाते. तसेच, हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांची (विलफुल डिफॉल्टर) नावे जाहीर केली जातात. त्यामुळे अशा व्यक्तींना इतर बँका पतपुरवठा करीत नाहीत. त्या माध्यमातून मालमत्तांचा शोध घेणे, त्यांचा लिलाव पुकारणे आणि कर्ज वसुली करणे अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे. - सुधीर पंडित, अध्यक्ष, रुपी बँक प्रशासकीय मंडळ.
........
टाच आणलेल्या मालमत्तांची संख्या २
प्रकार कर्जदार मूळ थकीत टाच आणलेली किंमत
संख्या रक्कम मालमत्ता (कोटीत)
तारण ५५ २३.१४ ६० ३४.१०
तारण नसलेली ८३ ८१.४५ २३० ६१.२३
एकूण १३८ १०४.५९ २९० ९५.३३
............
सहकार-सरफेसी कायद्यानुसार न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल प्रकरणे
प्रकार एकूण (प्रकरणे) रक्कम (कोटीत) निर्णय दिलेली (प्रकरणे ) किंमत
एमसीएस-१९६० ५२ ४७.१३ ३० ३७.५७
सरफेसी अॅक्ट २१ १.४२ १५ ०.९०
एकूण ७३ ४८.५५ ४५ ३८.४७