टवाळखोरांवर कारवाई, शाळेभोवती घालत होते घिरट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:27 AM2018-10-05T00:27:51+5:302018-10-05T00:28:10+5:30
पोलिसांनी उचलली वाहने : शाळेभोवती घालत होते घिरट्या
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेजवळ दुचाकीवरून घिरट्या घालणाऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईत शाळेजवळ दुचाक्यावरून फिरणाºया टवाळखोरांवर कारवाई करून २५ वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. विद्याधाम प्रशालेजवळ वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शाळेजवळ दुचाकीवरून घिरट्या घालणाºयांची संख्या वाढत असून त्यात अल्पवयीन शालेय युवकांचाही सहभाग असतो.
गुरुवारी (दि. ४) विद्याधाम प्रशालेजवळ काही युवकांचा समूह गोळा झाला असून वाद निर्माण झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस नाईक ब्रह्मा पोवार, बी. ए. बुधवंत, अविनाश पठारे, होमगार्ड आकाश कोठावळे आदींनी प्रशालेजवळ धाव घेतली. तेथे गोळा झालेले २० ते ३० युवक पोलीस आल्याची माहिती मिळताच त्यांच्याजवळील दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्या ठिकाणी उभ्या असलेल्या २५ दुचाकी काही पोलीस मित्रांच्या मदतीने उचलून टेम्पोत घातल्या. या दुचाकी
शिक्रापूर पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत.
पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या सर्व वाहनांवर कठोर कारवाई करणार आहे. अल्पवयीन युवकांच्या ताब्यात असलेल्या गाड्यांच्या मालकांना व त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ठाण्यात बोलावून त्यांच्यावरदेखील कारवाई करणार आहे.
- मयूर वैरागकर, सहायक पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे