Pune | बाईक टॅक्सीवर कारवाई करणार; रिक्षा संघटनांना विभागीय आयुक्तांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 01:42 PM2022-12-22T13:42:35+5:302022-12-22T13:43:26+5:30
ॲप तातडीने काढण्यासंदर्भात मागणी...
पिंपरी : बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाने महाराष्ट्र शासनाला पत्र दिले आहे. ॲप तातडीने काढण्यासंदर्भात मागणी केली आहे. पुणे आरटीओने ‘गुगल’ला पत्र दिले आहेत. प्रशासकीय पातळीवरती आम्ही पूर्ण प्रयत्न करत असून मी लवकरच पुणे पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा करून या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाला दिले.
बेकायदा टॅक्सी बाईक प्रश्नी तसेच रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे गुलाब सय्यद, ड्रायव्हर चालक-मालक संघटनेचे शिवा देशमुख, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. परंतु स्थानिक पातळीवरती हा प्रश्न सुटत नाहीये. यामुळे केंद्र सरकारने कायदे केले व राज्य सरकारने याबद्दल योग्य भूमिका घेतली नाही. यामुळे केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पातळीवरती आपल्याला लढावे लागणार आहे. पुढचा आंदोलन आम्ही दिल्ली आणि मुंबई येथेच करणार आहोत.