अतिक्रमण निरीक्षकांसह कर्मचा-यांवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:55+5:302021-01-18T04:09:55+5:30
पुणे : अतिक्रमण निर्मूलन करताना कारवाईचे चित्रीकरण करण्यासोबतच छायाचित्रे काढली जाणार आहेत. पंचानाम्याकरिता या डिजिटल पुराव्याचा वापर केला जाणार ...
पुणे : अतिक्रमण निर्मूलन करताना कारवाईचे चित्रीकरण करण्यासोबतच छायाचित्रे काढली जाणार आहेत. पंचानाम्याकरिता या डिजिटल पुराव्याचा वापर केला जाणार आहे. कारवाईनंतर जप्त मालाचा पंचनामा न करणा-या तसेच चित्रीकरण-छायाचित्र न काढणा-या अधिकारी-कर्मचा-यांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
अनधिकृत व्यवसाय करणा-या छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करताना अनेकदा विक्रेत्यांच्या वस्तुंची तोडफोड होते, मालाचे नुकसान होते. जप्त करण्यात आलेला माल सोडविण्याकरिता ५ हजार रुपये दंड आकारण्यात येतो. दंडाची रक्कम पूर्ण घेतली जाते. मात्र, माल अपूर्ण दिला जातो. विक्रेत्यांना पूर्ण शुल्क भरूनही पूर्ण माल मिळत नाही. यापैकी बहुतांश विशेषत: किमती माल चोरीला गेलेला असतो किंवा गहाळ होतो. यासोबतच अनेकदा दंड घेण्याऐवजी ‘चिरीमिरी’ घेऊन जप्त माल परत केला जातो. अशाच प्रकरणात येरवडा भागातील दोन कर्मचा-यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने अटकही करण्यात आली आहे.
अतिक्रमण कारवाई करताना वेळ खूप कमी असतो. कारण, विक्रेते त्यांचा माल घेऊन पसार होतात. कारवाई संपताच पुन्हा त्याठिकाणी बसून व्यवसाय करतात. कमी वेळात कारवाई करायची असल्याने पंचनामा करता येत नाही. परंतु, यापुढे कारवाईदरम्यान स्टॉल, हातगाडी अथवा पथारीवरील मालाचे चित्रीकरण आणि छायाचित्रे घेतली जाणार आहेत.