गळतीमुळे ठेकेदारावर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:14 AM2018-06-23T01:14:37+5:302018-06-23T01:14:45+5:30
ऐन उद््घाटनाच्या कार्यक्रमांत छतावरून झालेली पाण्याची गळती ठेकेदाराच्या अंगलट आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारीच केलेल्या चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे : ऐन उद््घाटनाच्या कार्यक्रमांत छतावरून झालेली पाण्याची गळती ठेकेदाराच्या अंगलट आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी
गुरुवारीच केलेल्या चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे उद््घाटन गुरुवारी दुपारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. नेमका याच वेळी मोठा पाऊस आला. त्याचे पाणी नव्या इमारतीच्या छतावर साचले व ते छतावरून थेट सभागृहात काही ठिकाणी गळू लागले. यावरून बराच गदारोळ झाला. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही ‘घाईत केलेल्या कामांचे दुसरे काय होणार?’ अशी टीका करीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीलाच यासाठी जबाबदार धरले.
महापौरांनी या सर्वच प्रकाराची गुरुवारीच गंभीर दखल घेतली व चौकशीचे आदेश दिले. शुक्रवारी त्याची माहिती देताना महापौरांनी सांगितले, की इमारतीच्या बांधकामात कसलाही दोष नाही, हे स्पष्ट झाले आहे. छतावरचे पाणी वाहून
नेणाऱ्या ठिकाणी इमारत स्वच्छ करताना झालेला कचरा साचला. त्यामुळे छतावर पाणी साचले.
पाऊस खूपच जोराचा झाला व हे पाणी वाढले. त्यामुळे जागा मिळेल तिथून ते वाहू लागले व सभागृहाच्या आत आले.
इमारतीच्या छतावर कचरा साचणे ही चूकच आहे. ही सर्व व्यवस्था पाहण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी व काम करणारी ठेकेदार कंपनी यांच्यावर याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली. कचरा काढून टाकल्यावर साचलेले सर्व पाणी वाहून गेले, नंतर पाऊसही कमी झाला व आतमध्ये होणारी पाणीगळती बंद झाली, याकडे महापौरांनी लक्ष वेधले.