हाॅटेल, पब रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्यास कारवाई होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:56 AM2024-02-20T10:56:50+5:302024-02-20T10:57:11+5:30
मध्यरात्रीनंतर हॉटेल, तसेच पब सुरू ठेवण्यात येत असून, आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या
पुणे: शहरातील रेस्टॉरंट बार, रुफटॉप हॉटेल, बार-रेस्टॉरंट आणि पब चालकांसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली तयार केली आहे. नियमावलीचे पालन न करता अटी व शर्थीचे उल्लंघन करुन रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही नियमावली लागू करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर कायमस्वरूपी निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
शहरात मध्यरात्रीनंतर हॉटेल, तसेच पब सुरू ठेवण्यात येत असून, आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली तयार केली आहे. नियमावलीत हॉटेल, पब चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांकडून नियमित तपासणी करण्यात येणार आहे. साउंडचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त नसावा. रहिवासी भागातील पब, हॉटेल चालकांनी सामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काय आहे नियमावली
* नियमभंग करणाऱ्या परमिट रुम, हॉटेल, पब चालकांवर कलम १४४ नुसार कारवाई होणार.
* रात्री दहानंतर मोठ्या आवाजात साऊंडचा वापर केल्यास कारवाई.
* हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार, किंवा डीजे येणार असल्यास परवानगी आवश्यक.
* विदेशी कलाकार कधी येणार, याची पासपोर्टसंदर्भातील सर्व माहिती द्यावी लागणार.
* पोलिस परवानगीनंतरच आयोजकांना तिकीट व विक्री तसेच प्रसिद्धी करता येणार.
* ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रसाधनगृह वगळता हॉटेलच्या सर्व भागांत सीसीटीव्ही बंधनकारक राहील.
* हॉटेल प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही आवश्यक.
* सीसीटीव्ही चित्रीकरणातील रेकॉर्डिंगसाठी दोन डीव्हीआर असणे आवश्यक.
* बाऊंन्सर, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी बंधनकारक.
* एखाद्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी संबंधित पोलिस उपायुक्तांची परवानगी बंधनकारक.
* १८ वर्षांखालील मुलांना मद्यविक्री करता येणार नाही. नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार.
* हॉटेलमध्ये धूम्रपानासाठी (स्मोकिंग झोन) असणे गरजेचे. अन्य ठिकाणी धूम्रपान करता येणार नाही.
* हुक्का, शिशा विक्रीवर बंदी, उल्लंघन केल्यास कडक कारवाई.