दुकाने उघडल्यास कारवाई तर होणारच : महापालिका आयुक्तांचा व्यापाऱ्यांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:51+5:302021-04-09T04:11:51+5:30
पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश शहरात लागू केले आहेत़ त्यामुळे शासनाच्या आदेशाचे ...
पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबतचे आदेश शहरात लागू केले आहेत़ त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर, शासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई तर होणारच, असा इशाराच गुरूवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे़ परिणामी शासनाच्या आदेशाला झुगारून शुक्रवारपासून दुकाने उघडणाऱ्या निर्णय घेणारे शहरातील व्यापारी, तर दुसरीकडे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून कारवाईस सज्ज असलेले प्रशासन असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विक्रम कुमार बोलत होते़ यावेळी अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ़ आशिष भारती उपस्थित होते़
कुमार म्हणाले, शहरातील व्यापारी वर्गाने आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन आम्हाला दिले आहे़ ते आम्ही राज्य शासनाकडे पाठविले आहे़ परंतु, कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता शासनाचे पुढील आदेश ज्याप्रमाणे आम्हाला येतील त्याप्रमाणे महापालिका कार्यवाही करेल़ सध्या तरी दुकाने बंद बाबतचे आदेश असल्याने शुक्रवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यात आली तर, संबंधितांवर शासनाच्या आदेशनानुसार कारवाई केली जाईल़
शुक्रवारी रात्री आठनंतर सोमवारी सकाळी सातपर्यंत राज्यासह शहरात संपूर्ण लॉकडाऊन आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिकेने लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी ६० टीम तयार केल्या असून, प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात त्या कार्यरत राहतील़ तसेच लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने पोलिस यंत्रणेस पत्र दिले असून, या काळात पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे़ दरम्यान ज्या ६० टीम तयार केल्या आहेत, त्या टीमकडून इतर दिवशी त्या-त्या क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत लसीकरणाची गती वाढविणे, नागरिकांना रूग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध करून देणे व मास्क वापर, सॅनिटायरचा वापर यांसह सोशल डिस्टसिंगचे पालन होते की नाही या तीन विषयांवर काम केले जाणार असल्याचेही विक्रम कुमार यांनी सांगितले़
---------------------------------