PMC: भटकी कुत्री, मांजरांना पकडण्यासाठी येणाऱ्या गाड्या अडविल्यास कारवाई करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:00 PM2023-08-29T19:00:33+5:302023-08-29T19:02:55+5:30
या संस्था शहराच्या विविध भागातील भटके कुत्रे व मांजरांना पकडून त्यांची नसबंदी करतात....
पुणे : महापालिकेच्या हद्दीतील भटक्या कुत्र्यांना व मांजरांना पकडण्यासाठी व नसबंदीनंतर त्यांना पुन्हा सोडण्यासाठी येणाऱ्या संस्थांच्या गाड्या अडवू नयेत, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांना व मांजरांना पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी व त्यांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेने ठराव करून युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी व कॅनिन कंट्रोल अँड केअर सेंटर या दोन संस्थांची नियुक्ती केली आहे. या संस्था शहराच्या विविध भागातील भटके कुत्रे व मांजरांना पकडून त्यांची नसबंदी करतात.
केंद्रीय प्राणी कल्याण मंडळाच्या आदेशानुसार ही भटकी कुत्री अथवा मांजर जिथून पकडून आणली, तिथेच पुन्हा सोडावी लागतात. मात्र, अशा कुत्र्यांना व मांजरांना पुन्हा त्याच जागी सोडण्यात येऊ नये, यासाठी या संस्थांच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे, त्यांच्या गाड्या अडवणे, अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. ही बाब प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची व मांजरींची नसबंदी व लसीकरण करण्याच्या मोहिमेमध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वतीने हे काम करणाऱ्या संस्थांचे वाहन अडवल्यास व त्यांच्या कामात अडथळा आणल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी स्पष्ट केले आहे.