पावसाळा संपेपर्यंत अनावश्यक रस्ते खोदाई केल्यास कारवाई करणार; अतिरिक्त महापालिका आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2023 06:27 PM2023-08-02T18:27:47+5:302023-08-02T18:28:04+5:30
शहरातील रस्त्यांची खोदाई करताना निविदा अटी व शर्तींनुसार ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी बोर्ड लावणे आवश्यक
पुणे : ‘पावसाळा संपेपर्यंत आवश्यक तेथेच खोदाई करण्यात यावी. त्यासाठी त्या त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात,’ असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले.
शहरातील खोदाईबाबत अतिरिक्त आयुक्तांनी पथ, विद्युत आणि मलनिस्सारण विभागासोबत नुकतीच बैठक घेतली होती. शहरातील वाहनांची संख्या सुमारे ३६ लाख व बाहेरून दररोज कामासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे १० लाख अशी सुमारे ४६ लाख वाहनांची वर्दळ शहरात असते. शहरातील रस्त्यांची खोदाई करताना निविदा अटी व शर्तींनुसार ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी बोर्ड लावणे आवश्यक आहे; परंतु ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारचे बोर्ड कामाच्या ठिकाणी लावले जात नाहीत. बोर्ड लावण्याची कार्यवाही करण्यात यावी. बोर्डावर कामाचे नाव, काम सुरू दिनांक, पूर्ण दिनांक, ठेकेदाराचे नाव, दूरध्वनी क्रमांक द्यावे. पथ, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत यांनी खोदाईबाबत समन्वय करून पुढील एक महिन्यात करावयाच्या खोदाईबाबत कार्यक्रम तयार करावा. त्याव्यतिरिक्त खोदाई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोणता विभाग कोठे खोदाई करणार आहे, याबाबत समन्वय करण्यात यावा. विद्युत विभागाचे एटीएमएसचे काम सुरू आहे.