वेताळ टेकडीवर दुचाकी चालवाल, तर कारवाई होणार! पाच जणांना घेतले ताब्यात
By श्रीकिशन काळे | Published: July 8, 2024 03:00 PM2024-07-08T15:00:37+5:302024-07-08T15:01:06+5:30
काही तरुण थेट दुचाकीवरून वेताळ टेकडीच्या वन क्षेत्रात जाऊन हुल्लडबाजी करतात
पुणे : वेताळ टेकडीवर अनेकदा तरूण दुचाकी घेऊन प्रवेश करतात. गाडीचा आवाज करतात आणि त्यामुळे वन्यजीव व टेकडीवर फिरायला येणाऱ्यांना त्रास होतो. शनिवार-रविवार तर त्यात भरच पडते. परंतु, आता वन विभागाच्या वतीने टेकडीवर दुचाकी घेऊन जाणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. रविवारी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात वन कायद्यानूसार कारवाई होणार आहे.
टेकडीवर दुचाकी घेऊन जाण्यास बंदी आहे. कारण टेकडी हा वन विभागाच्या अंतर्गत येणारा भाग आहे. पण काही तरूण थेट दुचाकी वन क्षेत्रात नेतात. तिथे जाऊन हुल्लडबाजी करतात. अशा तरूणांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी खास हेल्पलाइन नंबर देखील वन विभागाने दिला आहे. नागरिकांनी देखील याविषयी दक्ष राहून असा प्रकार कोणत्या टेकडीवर दिसला तर हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिली.
वेताळ टेकडीवर रविवारी (दि.७) सायंकाळी ७.१५ वाजता वन कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना काही तरूण दुचाकीवर फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले. तीन दुचाकीवर हे तरूण आले होते आणि तेथील नागरिकांशी हुज्जत घालत होते. दुचाकीचा हॉर्न देखील मोठ्याने वाजवत होते. त्यामुळे ५ जणांना वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. हे सर्व कॉलेजला जाणारे आहेत. भारतीय वन अधिनियमानूसार १९२७ अंतर्गत ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या सूचनेनूसार सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनरक्षक कृष्णा हाकके, दयानंद पंतवाड व धनाजी साळुंखे आदींनी कारवाई केली.
टेकडीवर गैरप्रकार झाल्यास येथे करा संपर्क
वेताळ टेकडीवर दुचाकी घेऊन जाऊ नये, खाणीमधील पाण्यात कोणीही उतरू नये. कारण त्या ठिकाणी जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी याविषयी जागरूक राहावे, कोणाला असे आढळून आले तर त्यांनी वन विभागाच्या १९२६ किंवा ७४७८७८९७९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी केले आहे.