आयटी कंपन्यांतील ‘स्मोकिंग झोन’वर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 07:34 PM2018-06-02T19:34:40+5:302018-06-02T19:35:27+5:30
जिल्ह्यात अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत. त्यांचे स्मोकिंग झोन आहेत. जे सर्वांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला .
पुणे : सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणांमाबाबत जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच, जिल्ह्यातील विविध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये (आयटी) असलेल्या स्मोकिंग झोनवर कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्याक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, डॉ. केतकी घाटगे, डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ. एस. एल. जगदाळे, डॉ. मिलिंद भोई, डॉ. पी. एस. आष्टीकर, दिलीप करंजखेले, प्रमोद पाटील, विनोद जाधव, सुर्यकांत कासार, डॉ. राहुल मणियार या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तसेच महापालिका हद्दीतील तसेच तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशिक्षण आयोजित करावे, विद्यार्थी व शालेय परिसरात व सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती द्यावी, तसेच आठवडे बाजार व इतर गर्दीच्या ठिकाणी याबाबतचे माहिती फलक लावण्यात यावे. याशिवाय बचतगट, फेरीवाल्यांच्या संघटनांनाही या कायद्याबाबत व तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती द्यावी, असे आदेश चव्हाण यांनी या वेळी दिले.
येत्या गणेशोत्सवात मंडळ प्रतिनिधींना भेटून त्यांचे सहकार्य घेऊन तंबाखूमुक्तीसाठी जनजागृती करावी, असे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात विविध आयटीकंपन्या आहेत, त्यांचे स्मोकिंग झोन आहेत, त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना यावेळी देण्यात आली.