Coronavirus| सात दिवसांच्या विलगीकरणानंतर कोरोना चाचणीची मागणी केल्यास कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:54 PM2022-01-19T12:54:20+5:302022-01-19T12:58:18+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला पाच हजारांच्या पुढे गेली आहे़
पुणे : कोरोना संसर्ग झाल्यावर सात दिवस विलगीकरणात राहून औषधोपचार घेणाऱ्यांना, ‘ आयसीएमआर ’ च्या (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, ICMR) मार्गदर्शक सूचनांनुसार सात दिवसानंतर पुन्हा कोरोना चाचणी (आरटीपीसीआर किंवा ॲंटिजन टेस्ट\RT-PCR, antigen testing) करण्याची गरज नाही़, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी दिली़
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला पाच हजारांच्या पुढे गेली आहे़. यामध्ये अनेकजण हे लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले नागरिक आहेत़ शहरातील ३५ हजार कोरोनाबाधितांपैकी केवळ ३ ते ४ टक्के रूग्ण की जे वयोवृद्ध अथवा सहव्याधीने ग्रस्त आहेत, अशांना रूग्णालयात उपचाराची गरज भासत आहे़ मात्र उर्वरित बहुतांशी रूग्ण हे गृह विलगीकरणात डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेऊन पाच ते सात दिवसात कोरोनामुक्त होत आहेत़
याच पार्श्वभूमीवर ‘आयसीएमआर’ ने कोरोनाबाधितांचा औषधोपचार पूर्ण झाल्यावर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे़ केंद्र शासनाच्या आरोग्य विभागानेही ९ जानेवारी, २०२२ रोजी कोविड-१९ च्या रूग्णांच्या कोरोनामुक्ती बाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्येही कोरोनाबाधितांनी पुन्हा कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे़
पुन्हा कामावर येताना चाचणीचे बंधन बेकायदेशीर
काही खासगी संस्था कोरोनाबाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर सामावून घेताना कोरोनाची चाचणी करण्याची मागणी करीत आहेत़ हीच परिस्थिती काही निवासी सोसायट्यांमधून सुध्दा दिसून आली आहे़ मात्र कोरोना चाचणीची मागणी पूर्णतः नियमबाह्य असून, महापालिकेने अशा प्रकारे कुठलीही चाचणी पुन्हा करू नये असे स्पष्ट केले आहे़
कोरोना चाचणीची मागणी करणाऱ्यांची तक्रार करा
कोरोनाबाधित झाल्यावर औषधोपचार पूर्ण केलेल्या व्यक्तीला कोरोना मुक्त झाला आहे का, म्हणून ज्या संस्था अथवा सोसायट्या पुन्हा कोरोनाची चाचणी अहवालाची मागणी करीत आहेत़ अशा संस्था अथवा सोसायट्यांची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागात करावी़ महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस बजावून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल़
डॉ़ संजीव वावरे, साथरोग नियंत्रण अधिकारी तथा सहायक आरोग्य प्रमुख पुणे महापालिका