महिन्याची नोटीस न देताच कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 06:52 AM2017-12-07T06:52:00+5:302017-12-07T06:52:10+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून ७५ टक्के हजेरी न भरल्याप्रकरणी परीक्षा सुरू असताना १० विद्यार्थ्यांना पेपर देण्यास मज्जाव केला गेला.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून ७५ टक्के हजेरी न भरल्याप्रकरणी परीक्षा सुरू असताना १० विद्यार्थ्यांना पेपर देण्यास मज्जाव केला गेला. नवीन विद्यापीठ कायद्यातील कलम ७५ नुसार विद्यार्थ्यांना एक महिन्यांची नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची बुधवारी मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट घेऊन कारवाईबाबत तक्रार केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्यांची मुदत दिली का, याबाबत संचालकांनी खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ७५ टक्के हजेरीच्या नियम लावण्यास सुरुवात करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. मराठी विभागाकडून हा कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
मराठीच्या १० विद्यार्थ्यांनी एका विषयाची परीक्षा दिल्यानंतर अचानक त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजीची भावना निर्माण झाली आहे. मराठी विभागामध्ये तिसºया सत्रात शिकणाºया विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती भरली नाही. त्यामुळे त्यांना पेपर देण्यास मनाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु समितीने परीक्षा सुरू होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय देणे आवश्यक असताना एक पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढचे पेपर देण्यास मनाई केली आहे.
समितीने नियमानुसार विद्यार्थ्यांना एक महिन्याची नोटीस देणे आवश्यक असताना ती न देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठाने मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली आहे.