अपंग पुनर्वसनासाठी सक्रिय सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:10+5:302021-07-07T04:13:10+5:30
पुणे : “राजस्थानमध्ये माझे वडील व सर्व परिवार सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतो. मीदेखील महापालिकेच्या माध्यमातून अपंग पुनर्वसन कार्यामध्ये सक्रिय ...
पुणे : “राजस्थानमध्ये माझे वडील व सर्व परिवार सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतो. मीदेखील महापालिकेच्या माध्यमातून अपंग पुनर्वसन कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत राहीन. जास्तीत जास्त अपंगांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करेन,” असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
अपघातांमुळे किंवा अन्य कारणांमुळे हात-पाय गमवाव्या लागलेल्या वीस अपंगांना भारत विकास परिषदेच्या पुणे केंद्रातर्फे विनामूल्य कृत्रिम पाय आणि हात देण्यात आले. त्या वेळी अग्रवाल बोलत होत्या. महापालिकेच्या थरकुडे दवाखान्याच्या आवारातील परिषदेच्या विकलांग पुनर्वसन केंद्रात हा कार्यक्रम झाला. परिषदेचे सर्वश्री दत्ता चितळे, विनय खटावकर, जयंत जेस्ते, अच्युत दीक्षित, मंदार जोग, विश्वास नायडू, शशिकांत पदमवर तसेच आरोग्य अधिकारी डॉ. पखाले, एरंडवणा दवाखान्याच्या प्रमुख डॉ. राजश्री देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
रुबल अग्रवाल यांच्या हस्ते पायांचे वितरण करण्यात आले. अंमळनेरचे इरफान तेली यांचे दोन्ही पाय रेल्वे अपघातात गेले होते. एका तरुणीचा पाय डेक्कन जिमखान्यावर भरधाव बसखाली सापडून तुटला होता. सासवड येथील एका तरुणाच्या पायावर कारखान्यामध्ये मोठा अवजड भाग पडल्यामुळे पाय गेला होता. अशा विविध वीस जणांना विनामूल्य अवयव देण्यात आले.
‘मॉड्यूलर फूट’ बसविण्याचा उपक्रम परिषदेतर्फे पुण्यात गेली २० वर्षे सुरू आहे. आतापर्यंत या केंद्रात १९ हजार अपंगांनी व पोलिओग्रस्तांनी कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स बसवून घेतले असल्याची माहिती चितळे यांनी दिली.