पुण्यात काचा फोडून गाडीतील साहित्य चोरणारी टोळी सक्रीय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 10:33 PM2017-12-09T22:33:47+5:302017-12-09T22:54:27+5:30
रस्त्याच्या कडेला मोटार पार्क करुन जाणे आता पुण्यात धोकादायक ठरु लागले आहे. भरदिवसा मोटारीच्या काचा फोडून काही मिनिटात आतील साहित्य घेऊन पोबारा करणारी टोळी पुन्हा शहरात सक्रीय झाली आहे.
पुणे - रस्त्याच्या कडेला मोटार पार्क करुन जाणे आता पुण्यात धोकादायक ठरु लागले आहे. भरदिवसा मोटारीच्या काचा फोडून काही मिनिटात आतील साहित्य घेऊन पोबारा करणारी टोळी पुन्हा शहरात सक्रीय झाली आहे.
पाषाण रोडवरील अभिमान हॉटेलसमोर पार्क केलेल्या चार मोटारीच्या काचा फोडून चोरट्यांनी त्यातील लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम असा १ लाख ७४ हजार रुपयांचा माल चोरुन नेला़ ही घटना शुक्रवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान एका तासाच्या आता सेंट जोसेफ गर्ल्स स्कुल येथील रोडवर घडली़ डॉक्टर, अभियंता यांनी पार्क केलेल्या या गाड्या होत्या.
पार्किंगचा प्रश्न असल्याने अनेक जण रस्त्याच्याकडे आपल्या गाड्या पार्क करुन आपल्या कामाला जातात़ मोटार लॉक असल्याने अनेक जण आपल्या किंमती वस्तू आतमध्येच ठेवत असल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे चोरट्यांचे आयतेच फावत आहे.
याप्रकरणी सोपान पाटील (वय ३६, रा़ पिंपळे गुरव) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्यांनी आपली मोटार पार्क केली होती़ चोरट्यांनी त्यांच्या मोटारीची काच फोडून आतील ७४ हजार रुपयांचा लॅपटॉप, चोरुन नेला़ त्यांच्या बाजूलाच अनुराधा सुब्रमण्यम यांच्या गाडीतील १५ हजार रुपये रोख व कागदपत्रे, डेव्हिड रायराज यांच्या गाडीतील लॅपटॉप, मोबाईल असा ४५ हजार रुपयांचा माल तसेच यश सप्रा यांच्या गाडीतील ४० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरुन नेला.
पुणे शहरात गेल्या काही दिवसात गाडीच्या काचा फोडून चोºया करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ असे किमान ६ गुन्हे नुकतेच घडले आहेत़ त्यामुळे रस्त्यावर गाडी पार्क करत असाल तर जरा जपूनच़ त्याशिवाय गाडीत कोणत्याही महत्वाच्या, किंमती वस्तू ठेवू नये.