पुणे येथे मंडळाचे कार्यकर्तेच झाले पोलीस अधिकारी ; आपआपल्या सोसायटयामध्ये केली नाकाबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 07:26 PM2020-04-08T19:26:08+5:302020-04-08T19:33:48+5:30
अत्यावश्यक सेवेच्या अधिकारी, पोलिसांना होतेय वाहतुकीस अडचण..
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव शहराचा पूर्व भाग सील करण्यात आला आहे. जेणेकरून प्रादुर्भाव झालेल्या भागांतील व्यक्तीचा शिरकाव इतर आणखी कुठे होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मध्य भागात पेठेतील काही सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागात नाकाबंदी केली आहे. आरोग्याच्या कारणासाठी केलेली ही उपाययोजना मात्र सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांना त्रासदायक ठरताना दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी शहरातील पूर्व भाग हा कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बंद करण्यात आला. त्याला त्या त्या संबंधित भागातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. असे असताना शहरातील काही मध्यवस्तीत असणाऱ्या सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या ठिकाणी नाकाबंदी केली आहे. यामुळे त्या मागार्ने जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेचे अधिकारी, कर्मचारी यांना जाण्यासाठी अडचणीला सामोरे जावे लागत आहे. इच्छितस्थळी जाण्यासाठी पयार्यी मागार्चा अवलंब करावा लागत आहे. नेहमीचा रस्ता सोडून अरूंद गल्ल्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यासगळ्यात मात्र काही मंडळातील कार्यकर्ते अशाप्रकारे नाकाबंदी करून खुशाल बिनधास्तपणे बाहेर येऊन बसत आहेत. ज्यासाठी पूर्ण भाग सील करण्यात आला आहे याची त्यांना चिंता नसल्याचे पाहावयास मिळाले. आपआपल्या भागातील रस्ते बंद केल्याने कुठल्याही वेळी पोलीस फिरकण्याची शक्यता कमी आहे. असे कार्यकर्त्यांनी गृहीत धरून सोशल डिस्टन्सिंंगचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. शहरात सध्या आरटीओ परिसर, मंगळवार पेठ, रविवार पेठ, याबरोबरच घोरपडी पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, रास्ता पेठ, सोमवार पेठ, वानवडी, कासेवाडी, सॅलसबरी पार्क हा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे आहे.
* काहीही झाले तरी बाहेर पडायचे नाही...
शहराच्या मध्यवस्तीतील पेठा, तसेच पूर्वेकडील काही भाग सील करण्यात आला आहे. जो भाग सील करण्यात आला आहे त्याठिकाणी कडेकोड पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काहीही झाले तरी नागरिकांनी घराबाहेर पडायचे नाही अशी ताकीद पोलिसांनी दिली आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच पर्यत दुकाने सुरू आहेत. यात किराणा व भुसार मालाची दुकाने तसेच जीवनावश्यक सेवा देणाऱ्या दुकानाचा समावेश आहे. भवानी पेठेत भुसार किराणा मालाची दुकाने आहेत. ती काही अंशी सुरू आहेत. या भागातील रस्ते बंद करण्यात आले असून छोट्या गल्ल्यांच्या मागार्ने तिथे जावे लागत असल्याचे त्या भागात डबे देणाऱ्या व्यक्तीने सांगितले.
* वानवडी भागातील एक इमारतीत कोरोनाचा रुग्ण सापडल्याने ती इमारत सील करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे केवळ बारकोड स्टिकर अथवा पासेस आहेत अशा व्यक्तींनाच बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कुठलेही कारण असल्यास त्यांना घरातून बाहेर निघण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.
* फक्त मेडिकल सुरू आहे...
कोंढवा भागात पूर्णपणे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलीस दर तासाला तिथे राऊंड घेत आहेत. दूध, भाजीपाला, किराणा मालाची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली असून केवळ मेडिकल सुरू ठेवण्यात आले आहे. सर्वजण पोलिसांच्या सूचना पाळत असून कुणीही घराबाहेर पडत नाही. दोन दिवसांपूर्वीच या भागातील नागरिकांनी भाजीपाला, दूध आणून ठेवले असल्याची माहिती त्या भागातील रहिवासी मोहम्मद अली यांनी दिली.