बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा पुतळा जाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 00:49 IST2020-08-02T00:46:14+5:302020-08-02T00:49:20+5:30
सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्रात फिरू न देण्याचा इशारा..

बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा पुतळा जाळला
बारामती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाल्याची जहरी टीका खोत यांनी केली आहे.प्रत्येक गावात देवाच्या नावानं एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा रेडा आहे. त्याला शेतकऱ्यांनी सोडून दिलंय. हा रेडा आता दिसेल त्या पिकात तोंड घालू लागला आहे, अशा शब्दांमध्ये खोत यांनी शेट्टींवर घणाघाती टीका केली. त्या टीकेचे तीव्र पडसाद बारामतीत शनिवारी दुपारी उमटले. स्ववाभिमानी शेतकरी संघटनेेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांचा पुतळा जाळला.
तसेच खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर स्वाभिमानीं शेतकरी संघटनेच्या विजय असो,एकच गट्टी राजु शेट्टी अशा घोषणा देत स्वाभिमानीचे कार्यकर्ते निघुन गेले.
सदाभाऊ खोत यांच्या टीकेवर पलटवार करताना राजू शेट्टी म्हणाले, दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनात शेतकरीच न दिसल्यानं खोत हे भ्रमिष्ट झालेे आहे.
खासदार शेट्टी यांच्या केवळ प्रकाशझोतात येण्यासाठी खोत टीका करतात. यापुढे खोत यांना महाराष्ट्रात फिरु देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष अमर कदम यांनी दिला.यावेळी कदम यांच्यासह अक्षय खंडाळे,पांडुरंग सोनवणे,गणपत कदम,विशाल काळे, दत्तात्रय जेलकर,नाथा चव्हाण आदी उपस्थित होेते.
—————————————