पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 02:52 PM2023-08-21T14:52:31+5:302023-08-21T14:53:02+5:30

लोकांना हसवण्याबरोबरच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला

actor Ashok Saraf name recommended for Padma Award Announcement by Sudhir Mungantiwar | पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

पुणे : पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून नावे पाठवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे. यंदाच्या वर्षी पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ ज्येष्ठ रंगकर्मी सराफ यांना मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. बं. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, कीर्ति सौरभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव, डॉ. प्रसन्न परांजपे, राधा पुरंदरे-आगाशे उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, ‘‘एखाद्या व्यक्तीला अभिनयाच्या माध्यमातून हसवणे कठीण काम आहे; मात्र अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचे महाकठीण काम अशोक सराफ यांनी केले. विनोदी अभिनयाबरोबर अशोक सराफ यांनी समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत, समाजमनावर संस्कार केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार प्रत्येक घरात पोहोचवला तर समाजात चांगली व्यक्तिमत्त्वे निर्माण होतील.’’

अशोक सराफ म्हणाले, ‘‘प्रत्येक कलाकार हा आपल्या परीने कलेत विविधता आणण्याचा प्रयत्न करत असतो; मात्र कलाकाराच्या प्रयत्नांना प्रेक्षकांचे पाठबळ मिळणे अत्यंत गरजेचे असते. प्रेक्षकांचे पाठबळ मिळाले नाही तर कलाकाराचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. मी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना प्रेक्षकांची साथ लाभली हे माझे भाग्य आहे.’’

पाटील म्हणाले, ‘‘अशोक सराफ यांची कामगिरी सतत उंचावत गेली. त्यांनी जीवनात यशाची अनेक शिखरे गाठली. त्यांची नाटके हमखास यशस्वी ठरायची. आज कर्तृत्व आणि नम्रता एकाच ठिकाणी आढळत नाही, असे सुंदर मिश्रण अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि बोलण्यात जाणवते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाजाच्या भल्यासाठी अनेक माणसे चांगले काम करीत असल्याची खात्री पटते.’’

Web Title: actor Ashok Saraf name recommended for Padma Award Announcement by Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.