कलाकार तयार पण... अभिनेता प्रियदर्शन जाधव यांची पुण्यातल्या नाट्यगृहाच्या स्थितीवर फेसबुकपोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 09:07 PM2019-02-09T21:07:07+5:302019-02-09T21:14:26+5:30
पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी वाचा फोडल्यानंतर आता कलाकार प्रियदर्शन जाधव याने ‘पडद्यावर’ भाष्य करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे.
पुणे : पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी वाचा फोडल्यानंतर आता कलाकार प्रियदर्शन जाधव याने देखील बिबवेवाडीच्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या तिस-या घंटेनंतर सहजपणे न घडणा-या ‘पडद्यावर’ भाष्य करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. या समस्येकडे तीन महिने व्यवस्थापनाच्या झालेल्या दुर्लक्षाबाबत देखील त्याने नाराजी व्यक्त केली आहे. मराठी कुटुंब खिशातले 2000 रूपये खर्च करून मराठी नाटके पाहायला येतात, मग त्यांना दर्जात्मक नाट्यगृह देणे ही आपली जबाबदारी नाही का? असा सवालही त्याने उपस्थित केला आहे.
गेले ३ महिने ’शांतेचं कार्ट’ या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने पुण्याच्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात येणे झाले. नाटकाचा पडदा तिस-या घंटे नंतर उघडला जात नाही तर तो हाताने खेचावा लागतो. दोन बॅकस्टेज वाले दोन बाजूने पडदा धरतात आणि खेचत खेचत विंगेत जातात. मध्यांतर जवळ आले की पुन्हा ते सज्ज होतात आणि पडदा पडत नाही तर खेचत आणतात आणि अंक पहिला संपतो. असे कित्येक प्रयोग सुरू असावे, हा वास्तववादी अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.त्याच पडद्याला दीपप्रज्वलन केल्यावर काही जणं तेलकट हात पुसतात त्यामुळे कदाचित तेल लावत गेला पडदा असे वाटून कुणी तो दुरुस्त करत नसावे, अशी मिश्किल टिप्पणीही त्याने केली आहे.
या संदर्भात अभिनेता प्रियदर्शन जाधव ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, आम्हाला मान्य आहे की ’शांतेचं कार्ट’ हे नाटक विनोदी ढंगाचे आहे. त्यामुळे प्रेक्षक एकदा ही गोष्ट गंमत म्हणून सोडून देतील. पण वारंवार कुणी कसे दुर्लक्ष करेल. अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हे पुण्यातील चांगले नाट्यगृह आहे. मेकअप रूम मोठ्या आहेत, प्रशस्त पार्किंग आहे. कुठलीच तक्रार नाही पण हा इतका छोटा प्रॉब्लेम व्यवस्थापन
पटकन सोडवू शकत नाही याचे वाईट वाटते. डिसेंबर मध्ये याच नाट्यगृहात ‘शांतेचं कार्ट’ चा प्रयोग झाला होता. तेव्हाही हाच अनुभव आला. पुन्हा 3 फेब्रुवारीला प्रयोग झाला तेव्हाही स्थिती ‘जैसे थे’चं असल्याचे पाहायला मिळाले. आजही प्रेक्षक मराठी नाटके आवडीने पाहायला येतात. नाटकाला यायचे झाले तर एका कुटुंबाला 2000 रूपये खर्च करावे लागतात. मग त्यांना दर्जाची नाट्यगृह देणे आपले काम नाही का? या प्रश्नातून त्याने महापालिका आणि नाट्यगृह व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
सदाशिव लायगुडे, नाट्यगृह व्यवस्थापक : अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या पडद्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाला कळविले आहे. विभागातील कर्मचारी पाहाणी करून गेले आहेत. येत्या आठ दिवसामध्ये हा प्रॉब्लेम सुटेल.