अभिनेते सोलापूरकर यांची पुन्हा एकदा माफी; डॉ. आंबेडकर यांच्याबद्दलचे वक्तव्य भोवले
By राजू इनामदार | Updated: February 10, 2025 16:34 IST2025-02-10T16:32:18+5:302025-02-10T16:34:35+5:30
सोलापूरकर यांना कसलीही माहिती नाही, ते मनुवादी आहेत अशी टीका भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केली.

अभिनेते सोलापूरकर यांची पुन्हा एकदा माफी; डॉ. आंबेडकर यांच्याबद्दलचे वक्तव्य भोवले
पुणे: अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा जाहीर माफी मागावी लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य त्यांच्या अंगलट आले. त्यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांच्या निवासस्थानासमोर भीम आर्मी, संभाजी ब्रिगेड यांनी सोमवारी सकाळी निदर्शने केली. आंबेडकरी चळवळीतील अन्य कार्यकर्त्यांनीही त्यांचा निषेध केला.
वेदांमध्ये जो अभ्यास करतो तो ब्राह्मण असे म्हटले असून त्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात असे एका कार्यक्रमात बोलताना सोलापूरकर म्हणाले होते. त्याचा व्हिडीओच राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल केला. त्यानंतरच लगेचच सोलापूरकर यांचा निषेध सुरू झाला. आव्हाड यांच्याबरोबरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) अध्यक्ष खरात यांनी त्यांचा निषेध केला व त्यांना राज्यात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ते सुनील माने, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही सोलापूरकर जाणीवपूर्वक अशी विधाने करत असल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केला. भीम आर्मी च्या वतीने कोथरूडमधील सोलापूरकर यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी सकाळी निदर्शने केली. सोलापूरकर यांना कसलीही माहिती नाही, ते मनुवादी आहेत अशी टीका भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यांना देत असलेले पोलिस संरक्षण त्वरीत काढून घ्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. संभाजी ब्रिगडेचे संतोष शिंदे यांनी सोलापूरकर यांच्यावर टीका करत त्यांना दिलेला पोलिस बंदोबस्त काढून घ्यावे व थोर पुरूषांचा बदनामी करत असल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून उठलेला गदारोळ शांत होत नसतानाच सोलापूरकर यांचे आणखी एक वक्तव्य वादग्रस्त ठरले असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांनी त्यांच्या घरासमोर मागील ५ दिवसांपासून बंदोबस्त लावला आहे. एक मोठी पोलिस व्हॅनच त्यांच्या घराखाली उभी असते. निदर्शने करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोसायटीत आत जाऊन निदर्शने करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरच घोषणा देत ठाण मांडले.
सोलापूरकर यांचा माफीनामा
त्यानंतर सोमवारी सकाळी लगेचच सोलापूरकर यांनी परत समाजमाध्यमाद्वारे जाहीर माफी मागत असल्याचे सांगितले. आपल्या व्याख्यानातील शब्दांची फिरवाफिरव करत असे वाद उपस्थित केले जात आहेत असे त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे व्याख्याने देत असून त्यामध्ये थोर पुरूषांच्या कर्तृत्वाचा आढाव घेत असतो. असे करताना त्यांच्याबद्दल कधीही अवमानकारक शब्द वापरले नाहीत, तसे कधी मनातही नसते, तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असे त्यांनी म्हटले आहे.