अभिनेत्री आर्या घारेने चक्क स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:56 PM2022-08-09T13:56:22+5:302022-08-09T13:57:23+5:30
आर्याचा आगळावेगळा वाढदिवस श्रावणातल्या सरीसोबत साजरा...
भोसरी : प्रत्येकाला वाटते की, आपला वाढदिवस रम्य, प्रसन्न ठिकाणी साजरा व्हावा. मात्र चऱ्होलीतील अभिनेत्री आर्या घारे हिने आपला वाढदिवस चक्क भयाण अशा स्मशानभूमीत साजरा केला आहे. तिला शुभेच्छा देण्यासाठी तिचे आप्तेष्ट, मित्र - मैत्रीण आणि इतरही मंडळी मोठ्या प्रमाणावर जमली होती. आर्या हिचा असा आगळावेगळा वाढदिवस श्रावणातल्या सरीसोबत साजरा झाला. आर्या घारे व तिची आई वैशाली घारे यांनी अंधश्रद्धेचा निषेध करत नवीन विचारांचा पायंडा पाडत भोसरी येथील स्मशानभूमीमध्ये हा वाढदिवस साजरा केला. याचे चांगलेच कौतुक होत आहे.
आर्या घारे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सतीश फुगे, संदीप राक्षे तसेच अथर्व शिंदे, नेहा वर्मा, दर्शन रानवडे, भगवान माने, काळुराम लांडगे, माऊली जावळकर, गणेश गवळी, रत्नेश शेवकरी, संतोष जांभुळकर आदी उपस्थित होते. आर्या हिने देऊळबंद, भिरगीट, अबक आणि बॅक टू स्कूल अशा चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. श्रावण महिन्यातील कधी रिमझिम तर कधी जोरात पाऊस मंगळवारी पडत होता. थोडी थंडी पडलेली. भयाण शांतता अशा वातावरणात स्मशानभूमीत सगळ्यांनी चॉकलेट केक खाऊन आणि पर्यावरण संरक्षणाचे भान राखत झाडांचे वाटप केले. अशा आनंदी वातावरणात छोटेखानी सोहळाच रंगला.
अशी सुचली संकल्पना
आर्या घारे अभिनय क्षेत्रातील उदयोन्मुख मुलगी, तिची आई वैशाली घारे या विविध सामाजिक उपक्रमात गुंतलेले व्यक्तिमत्व. मात्र या दोघांमधील समान दुवा म्हणजे परिवर्तनवादाचा विचार जिथे जिथे अंधश्रद्धा, रूढी परंपरा, बुरसटलेले विचार यांना पायबंध घालण्याची वेळ येते तेव्हा या दोघी नेहमीच पुढे असतात. त्यामुळेच दरवर्षी आर्या हीच वाढदिवस अशाच अभिनव उपक्रमातून साजरा केला जातो. कधी गरजूंना मदत तर कधी सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला जातो. आज स्मशानभूमीत साजरा झालेला वाढदिवस हा देखील अशाच एका परिवर्तनवादाचा दृष्टिकोन असल्याचे आर्याची आई वैशाली घारे यांनी सांगितले
झगमगाटात सारे जण वाढदिवस साजरे करतात. पण अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करावा ही संकल्पना आईला सुचली. यातून नक्कीच चांगलाच संदेश दिला गेला आहे. दरवर्षी वेगळ्यापद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या आईचा मला अभिमान वाटतो.
-आर्या घारे, अभिनेत्री