Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

By श्रीकिशन काळे | Published: October 29, 2024 06:17 PM2024-10-29T18:17:37+5:302024-10-29T18:18:20+5:30

डॉ वीणा देव या लेखिका, समीक्षक असून त्यांना अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते

actress Mrinal Kulkarni mother Dr. Veena Dev passed away | Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

Dr.Veena Dev Passed Away: लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

पुणे : लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव (वय ७६) यांचे आज निधन झाले. त्या प्रसिध्द साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत, तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांची आज प्राणज्योत मालवली.
 
पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्या मराठी विभागप्रमुख होत्या. तेथे त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. ‘मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे’ या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली होती. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले. या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांनी गो. नी. दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तीचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य होत्या. त्यांना ‘मोरया गोसावी जीवनगौरव’ तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार मिळाला होता. डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली होती. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन करणे याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दुरदर्शनवर सहभाग असायचा.

१९७५ पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे ६५० हून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. तसेच गो. नी. दा. यांच्या स्मरण-जागरणासाठी त्यांचे पती विजय देव यांच्या मदतीने त्या मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, गो. नी. दा. यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन अशांसारखे उपक्रम राबवित. मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो. नी. दा. यांच्या दुर्मिळ साहित्यकृती प्रकाशित केल्या.

Web Title: actress Mrinal Kulkarni mother Dr. Veena Dev passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.