Pune Airport| आंतरराष्ट्रीय नाही तर बारामती, पुरंदर व दौंडमध्ये अदानींचे खासगी विमानतळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 01:25 PM2022-01-29T13:25:20+5:302022-01-29T13:30:36+5:30
सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (pune airport) जागेचा प्रस्ताव रद्द करण्यामागचे खरे गुपित अखेर समोर ...
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (pune airport) जागेचा प्रस्ताव रद्द करण्यामागचे खरे गुपित अखेर समोर आले आहे. आता लवकरच बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्याच्या सीमेवर खासगी विमानतळ उभारण्यात येणार आहे. या तीन तालुक्यातील आठ गावांमधील सुमारे साडेतीन हजार एकर जमिनीवर अदानी ग्रुपच्या वतीने मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून, यामध्ये विमानतळ प्रस्तावित आहे. या संदर्भातील प्रस्ताव औद्योगिक महामंडळाने केंद्र शासनाला पाठवला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उड्डाण जवळजवळ निश्चित झाले असताना राज्य शासनाने पाठवलेल्या नवीन जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द करत मोठा धक्का दिला आहे. परंतु यामागची खरी वस्तुस्थिती आता समोर आली आहे.
पुरंदर विमानतळाच्या नव्या जागेचा परवाना राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने रद्द केला. त्यामुळे विमानतळ जुन्या जागेत होणार का आणि त्याला परवानगी मिळणार का हा विषय चर्चेत असतानाच आता अदानी समूहाकडून या प्रस्तावित विमानतळाच्या लगत किंबहुना विमानतळाच्या क्षेत्रात जाणाऱ्या काही गावांमध्ये देखील मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.
मल्टीमेडल लॉजिस्टिक पार्कसाठी पुरंदर तालुक्यातील राजुरी, पिसे, नायगाव आणि पिंपरी बारामती तालुक्यातील आंबी, भोंडवे वाडी आणि चांदगुडे वाडी तर दौंड तालुक्यातील खोर या आठ गावांमधील साडेतीन हजार एकर जमीन घेण्यात येणार आहे. औद्योगिक महामंडळाने या जागेचे सर्वेक्षण करून मल्टी मेडल लॉजिस्टिक पार्कच्या आराखड्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला मान्यतेसाठी पाठवला आहे.
विमानतळाच्या प्रस्तावानंतर पुरंदर तालुक्यातील या परिसरात अनेक उद्योजकांकडून प्रकल्पांसाठी जागेची मागणी येऊ लागली आहे. केंद्र सरकारने नुकताच पुरंदर विमानतळाच्या नव्या जागेचा प्रस्ताव आणि मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत विमानतळ पूर्वेला होणार की खेड तालुक्यात याबद्दल संभ्रम आहे. पुरंदर विमानतळाची मान्यता रद्द झाली असली तरी मल्टी मेडल लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव मात्र गतीने पुढे गेला असून, लवकरच त्याला केंद्र सरकारकडून मान्यता मिळेल अशी माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.