यात्रेसाठी निघालेल्या सख्ख्या भावांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 04:17 PM2023-04-13T16:17:57+5:302023-04-13T16:18:31+5:30
एक भाऊ सातवीत तर दुसरा तिसरीत शिकत होता
निमगाव केतकी : निमगाव केतकी येथे यात्रेसाठी येत असताना खडकी (ता. दौंड) येथे कुटुंबाचा अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे निमगाव केतकी येथे शोककळा पसरली आहे.
केतकेश्वर महाराज यात्रेनिमित्त गावी येत असताना निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील संतोष एकनाथ भोसले कुटुंबाच्या चारचाकीला पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खडकीनजीक भीषण अपघात झाला होता. यात संतोष भोसले, पत्नी व दोन मुलगे गंभीर जखमी झाली होती. पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आर्यन संतोष भोसले (वय १२) याचा ६ एप्रिल रोजी, तर मंगळवारी (दि. ११) आयुष संतोष भोसले (वय ८) या मुलाचादेखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पती संतोष व अश्विनी संतोष भोसले हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. निमगाव केतकीतील संतोष एकनाथ भोसले हे आपल्या कुटुंबासह पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक होते. आपल्या गावाकडे यात्रेला येत असताना दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या आसपास दौंड तालुक्यातील खडकी येथे या दाम्पत्याच्या चारचाकी गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर संतोष भोसले यांच्यासह तिन्ही अपघातग्रस्तांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. यातील आयर्न भोसले हा इयत्ता सातवीमध्ये शिकत होता, तर आयुष भोसले हा तिसरीत शिकत होता.