तरुणाईला नशा ‘एलएसडी स्टॅम्प’ची! एका ‘स्टॅम्प’साठी मोजताहेत चार ते सात हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 02:53 PM2023-09-12T14:53:43+5:302023-09-12T14:54:42+5:30

पाेलिसांनी जप्त केले १ कोटी १६ लाखांचे एलएसडी स्टॅम्प...

Addiction to the youth of 'LSD stamp'! One 'stamp' costs four to seven thousand rupees | तरुणाईला नशा ‘एलएसडी स्टॅम्प’ची! एका ‘स्टॅम्प’साठी मोजताहेत चार ते सात हजार रुपये

तरुणाईला नशा ‘एलएसडी स्टॅम्प’ची! एका ‘स्टॅम्प’साठी मोजताहेत चार ते सात हजार रुपये

googlenewsNext

- नम्रता फडणीस

पुणे : कोणताही कायदेशीर दस्ताऐवज असेल किंवा एखाद्याबरोबर कायदेशीर करार करायचा असेल तर ‘रेव्हेन्यू स्टॅम्प’चा वापर केला जातो हे सर्वश्रुत आहे; पण नशेसाठीच आता रेव्हेन्यू स्टॅम्पपेक्षा आकाराने खूप छोटे असलेल्या ‘एलएसडी स्टॅम्प’चा वापर केला जातोय, असं सांगितलं तर? ऐकून कदाचित धक्का बसेल ! हे खरे आहे. सध्या महाविद्यालयीन तरुणांमध्ये नशेसाठी ‘लिसेर्जिक ॲसिड डायथिलामाइड’ अर्थात ’एलएसडी स्टॅम्प’ची क्रेझ वाढली आहे. तरुण एका एलएसडी स्टॅम्प’साठी जवळपास चार ते सात हजार रुपयांपर्यंत किंमत मोजत आहेत.

‘एलएसडी स्टॅम्प’ची मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. आता पुण्यातही या नशेचे शौकिन आढळले आहेत. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. यात तरुणाईला मोठ्या प्रमाणावर टार्गेट केले जात आहे. नुकतेच पुण्यात ९८६ मिलिग्रॅम इतके सव्वा कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 'एलएसडी स्टॅम्प’ पोलिसांनी जप्त केले आहेत. उच्चभ्रू पाट्यांमध्ये विद्यार्थी, आयटी कंपन्यातील तरुण आणि परदेशी नागरिक हा ‘एलएसडी स्टॅम्प’चा मोठा ग्राहक असल्याची पोलिसांची माहिती आहे.

एलएसडी स्टॅम्पचे पुण्यात घडलेले हे यंदाचे सर्वात मोठे प्रकरण असून, पोलिसांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांचे ’एलएसडी स्टॅम्प' जप्त केले आहेत. मुख्य पुरवठादार, वितरक, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता आणि ग्राहक अशी साखळीच पोलिसांना सापडली असून, अजूनही तपास सुरू आहे. या साखळीत मुख्य पुरवठादाराकडून ग्राहकाच्या हातामध्ये 'एलएसडी स्टॅम्प' येईपर्यंत त्याची किंमत ३०० रुपयांपासून चार ते दहा हजार रुपयांपर्यंत वाढलेली असते.

’एलएसडी स्टॅम्प’चं का?

नशेच्या अन्य पदार्थांच्या तुलनेच 'एलएसडी स्टॅम्प' सोबत बाळगणे सोपे असते. त्याला चव नसते. त्याची नशा करण्याची पद्धतही सोपी असते; तसेच समाजात वावरताना कोणालाही त्याबद्दल संशय येत नाही. त्यामुळे 'एलएसडी स्टॅम्प'ला तरुणांची मागणी असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

पाेलिसांनी जप्त केले १ कोटी १६ लाखांचे एलएसडी स्टॅम्प :

पोलिसांनी ४१ ग्रॅम एलएसडी स्टॅम्प जप्त केले असून, त्याचे मूल्य हे १ कोटी १६ लाख ३५ हजार ३०० रुपयांच्या घरात आहे. पोलिसांनी एलएसडी स्टॅम्पची विक्री करणारे पाच आरोपी ताब्यात घेतले आहेत. याचा तपास महिला पोलिस निरीक्षक शुभांगी जानकर करीत आहेत.

काय आहे एलएसडी? :

’लिसेर्जिक ॲसिड डायथिलामाइड’ (एलएसडी) हे बोलचालीच्या भाषेत ॲसिड म्हणून ओळखले जाते. हे एक शक्तिशाली सायकेडेलिक औषध आहे. एलएसडीच्या प्रभावांमध्ये सामान्यत: तीव्र विचार, भावना आणि संवेदनाक्षम धारणांचा समावेश होतो. पुरेशा उच्च डोसमध्ये एलएसडी प्रामुख्याने मानसिक, दृश्य आणि श्रवणभ्रमाचा परिणाम करते. स्टॅम्पसाठी वापरल्या जाणाऱ्या शोष कागदावर पाठीमागे ‘मायक्रोग्रॅम'मध्ये नशेसाठी वापले जाणारे एक ॲसिड लावण्यात येते. नशा करण्यासाठी हा स्टॅम्प' जिभेखाली किंवा टाळूला चिटकवण्यात येतो. त्यातील अमली पदार्थामुळे नशा येऊन कोणत्याही संवेदना जाणवत नाहीत. एका स्टॅम्पची किंमत चार ते दहा हजार रुपयांपर्यंत असते.

असा लागला तपास !

पोलिसांना पेट्रोलिंगद्वारे माहिती मिळाली की एक तरुण एलएसडी स्टॅम्पची विक्री करीत आहे. त्या तरुणाला टीमने ताब्यात घेतले. चाैकशीत त्याने सांगितले की, ‘एका मुलाने मला हे दिले आहे.’ मग त्या मुलाकडे चौकशी केली असता त्याने एका कुरिअर कंपनीकडून मागविले हाेते. त्याच्या एका मित्राने कुरिअर कंपनीला सांगून थेट मित्राला देण्यास सांगितले हाेते. त्या बॉक्सवर पोलिसांना कुरिअर कंपनीचा क्रमांक मिळाला. एका ठिकाणाहून मी हे कलेक्ट केले आहे, असे त्या कुरिअरच्या डिलिव्हरी बॉयने सांगितले. यावरून हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.

पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महाविद्यालयात व्याख्याने, तरुणांचे समुपदेशन केले जात आहे. कुरिअर कंपन्यांचीही लवकरच बैठक घेतली जाणार आहे.

- अश्विनी सातपुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे 1 शाखा

Web Title: Addiction to the youth of 'LSD stamp'! One 'stamp' costs four to seven thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.