कही राख..कही धुआँ..तल्लफ की आग में जल रहा पुणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 03:47 PM2018-10-13T15:47:18+5:302018-10-13T16:01:50+5:30
काही महिन्यांपूर्वी पंजाबमधील तरुणपिढी कशी व्यसनाच्या आहारी गेले आहे, हे सांगणारा उडता पंजाब हा चित्रपट खूप गाजला होता़. पण, केवळ पंजाबच नाही तर देशातील शैक्षणिक हब म्हटले जाणाऱ्या पुणे शहराची वाटचालही आता त्याच दिशेने सुरु आहे़.
विवेक भुसे
पुणे : काही दिवसांपूर्वी तो खूप चांगला होता हो! पण गेल्या काही दिवसांपासून तो फारसा जेवत नाही़ सतत चिडचिड करतो, घरातील वस्तूची आदळआपट करु लागला आहे़. त्याला नेमके काय झालंय हेच समजत नाही़. एका चांगल्या घरातील पालक आपली व्यथा बोलून दाखवत होते़. त्यांचा २२ वर्षांचा मुलगा खरं तर गांजाच्या व्यसनात अडकला होता़. त्याला तो आता वेळेवर मिळत नसल्याचे त्याचे मानसिक स्वास्थ बिघडले होते़ अशी समस्या सध्या शहराच्या वेगवेगळ्या भागातील पालकांना सतावत आहे़. आपला मुलगा, मुलगी कधी या व्यसनाच्या आहारी गेला हे त्यांना समजतच नाही़ जेव्हा समजते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो़.
काही महिन्यांपूर्वी पंजाबमधील तरुणपिढी कशी व्यसनाच्या आहारी गेले आहे, हे सांगणारा उडता पंजाब हा चित्रपट खूप गाजला होता़. पण, केवळ पंजाबच नाही तर देशातील शैक्षणिक हब म्हटले जाणाऱ्या पुणे शहराची वाटचालही आता त्याच दिशेने सुरु असल्याचे शहरातील वाढत्या अमली पदार्थाच्या व्यापारावरुन दिसून येऊ लागले आहे़.
यावर्षी जानेवारी ते आॅगस्ट या ८ महिन्यात पुणे पोलिसांनी अमली पदार्थ बाळगणारे आणि त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या ९३ जणांना अटक केली असून त्याचे तब्बल ४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़. सप्टेंबर महिन्यात अशा १० केसेस झाल्या आहेत़. त्यात प्रामुख्याने गांजाची वाहतूक व ते बाळगणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे़.
या व्यसनांचा विळखा लहान मुले, महाविद्यालयीन तरुण, तरुणी यांवर अधिक घट्ट होऊ लागला आहे़
शासनाने हुक्का पॉर्लरवर बंदी घातल्यानंतर या व्यसनांविरोधात जनजागृती करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे़ शहरात अनेक अधिकृत आणि बेकायदेशीरपणे हॉटेलमधून हुक्का पार्लर चालविली जात होती़ हुक्काच्या नावाखाली तरुण तरुणींना त्यातून गांजाची सवय लावली जात होती़. हुक्का हे व्यसन नाही, असे सांगितले जात असल्याने अनेक जण मौज म्हणून इतरांच्या संगतीने हुक्का ओढायला लागत़. काही दिवसाच्या सेवनानंतर तरुणाईना त्याची सवय लागते़... याशिवाय सिगारेट, दारु यांचा जसा वास येतो, त्याप्रमाणे हुक्का, गांजा यांचा वास येत नसल्याने इतरांना विशेषत: पालकांना त्याचा संशय येत नाही़ दारु, सिगारेट यांचे व्यसन लागण्यास जसा काही वेळ लागतो़. तसे गांजा अथवा इतर अमली पदार्थांचे नसते़ काही दिवसात त्यांचे व्यसन लागते़.
याबाबत आनंद व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ़ अजय दुधाणे यांनी सांगितले की, शहरात गांजा सहज उपलब्ध होत असल्याचे त्याच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे़. विशेषत: महाविद्यालयीन तरुणतरुणी त्याच्या मोठ्या प्रमाणावर आहारी जात आहे़. पुणे रेल्वे स्टेशन, पाटील इस्टेट, विमाननगर, कोंढवा, कासेवाडी या भागात सर्रास गांजा मिळत असल्याने व तो स्वस्त असल्याने त्यांचे व्यसन वेगाने वाढत जात आहे़. फर्ग्युसन कॉलेज रोड, महात्मा गांधी रोड, कोरेगाव पार्क या भागात गांजापासून एम डी, कोकेन पासून सर्व प्रकारचे पदार्थ सर्रास उपलब्ध होताना दिसतात़. येरवडा, कासेवाडी परिसरात ओल्या भांगचा वापर वाढताना दिसू लागला आहे़. याचबरोबरच चिंचे सारखा मधुर मनुका छोट्या प्लास्टिक पिशव्यांमधून विकला जातो़. या मधूर मनुका नाकोट्रिक ड्रग्जमध्येच मोडतात़ पण, त्याच्यावर कोणाचे नियंत्रण नाही, असे त्यांनी सांगितले़.
लष्कर पोलिसांनी मंगळवारी एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला कोकेनची विक्री करण्यासाठी आला असताना पकडले़. हिंजवडीतील एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी असतानाही त्या क्षेत्रातील तरुण व इतरांमध्ये या अमली पदार्थाचे व्यसन लागले असल्याने व त्यात जादा नफा मिळत असल्याने तो कोकेनची तस्करी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून करु लागला होता़.
हुक्का पिणाऱ्या ७०० जणांवर कारवाई
शासनाने हुक्का पार्लरवर आता बंदी घातली असली तरी पुणे शहर पोलिसांनी जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत हुक्का पिणाऱ्याया सुमारे ७०० जणांवर कारवाई केली आहे़. पुणे पोलिसांनी हुक्का पार्लरवर बंदी घालावी, असा प्रस्ताव शासनाकडे गेल्या वर्षी नोव्हेंबर २०१७ मध्ये पाठविला होता़ त्याचा विचार करुन शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी सांगितले़.
शहरातील साधारण २० ते २२ हॉटेलमधून हुक्का पार्लर चालविले जात होते़. मात्र, त्यावर कारवाई करताना कायद्याच्या मर्यादा होत्या़ केवळ वैधानिक इशारा नसलेला हुक्का पिण्यास दिला तरच मालकावर कारवाई करता येत होती़. केवळ २०० रुपये दंड करता येत होता़. हुक्क्याचे दुष्परिणाम आणि तरुण पिढी त्याच्या सेवनात ओढली जात असल्याचे लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी हुक्का पार्लरवर बंदी घालावी व तो चालविणाऱ्यावर ५ वर्षे शिक्षा व २० हजार रुपये दंड करावा, असा प्रस्ताव पाठविला जातो़. पुणे व इतरांनी पाठविलेल्या प्रस्तावाचा विचार करुन शासनाने ४ आॅक्टोंबरला हुक्का पार्लरवर बंदी घातली असून त्यात ३ वर्षे शिक्षा आणि १ लाख रुपये दंडाची तरतुद केली आहे़.
शहरातील सर्व हॉटेल व इतर ठिकाणी सुरु असलेले हुक्का पार्लर पोलिसांनी हा कायदा येण्यापूर्वीच बंद केले असल्याचे दोरगे यांनी सांगितले़ .
....................
आमच्या व्यसनमुक्ती केंद्रात सध्या गांजाचे अॅडिक्ट झालेले २० ते २५ जण भरती झाले आहेत़. हे व्यसन बिनवासाचे असल्याने आपला मुलगा अथवा मुलगी कधी या व्यसनाच्या आहारी गेला. हे पालकांना समजत नाही़ पुढे २ ते ३ वर्षात त्याला त्याचा त्रास सुरु होतो़. मानसिक तोल ढासळतो़. त्यातून तो अनेकदा गुन्हेगारीकडेही वळताना दिसतो़ त्याबाबत मुले व पालकांमध्ये जनजागृतीची मोठी गरज आहे़.
.......................
अमली पदार्थ विरोधात झालेल्या कारवाया
महिना गुन्हे दाखल अटक
जानेवारी ५ ११
फेबु्रवारी ७ १९
मार्च ७ ६
एप्रिल ५ १२
मे ५ १४
जून ४ ९
जुलै ४ ८
आॅगस्ट ८ १४
...................
२०१६ मध्ये पुणे पोलिसांनी ४२ गुन्हे दाखल करुन ४९ आरोपींना अटक केली होती़. तर २०१७ मध्ये ५६ गुन्ह्यांमध्ये ६१ जणांना अटक केली होती़.
.................