ऐन उन्हाळ्यात आधुनिकतेची जोड देत तरुणाने साकारले मोबाईल रसवंतीगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:03 PM2021-03-25T13:03:47+5:302021-03-25T13:04:50+5:30
आले, लिंबाचा रस आदी मिश्रण असल्याने या उसाच्या रसाची चव काही न्यारीच
बारामती: उन्हाळ्यात नागरिक पौष्टिक अशा ऊसाच्या रसाला पसंती देत असतात. हेच औचित्य साधून तरुणाने आधुनिकतेची जोड देत मोबाईल रसवंतीगृह सुरू केले आहे. गुणवडी येथील अण्णा गावडे या तरुणाने तयार केलेल्या या रसवंती गृहाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसादही मिळू लागला आहे.
उन्हाळ्यात शीतपेयांची मागणी वाढू लागते. रखरखत्या उन्हात नागरिक लिंबू सरबत, नीरा, उसाचा रस याकडे आकर्षित होतात. हि आरोग्यवर्धक पेय शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तरुणही आता अशा व्यवसायांकडे मोठया प्रमाणावर वळू लागले आहेत. त्यामध्ये आधुनिकतेची भर घालून अण्णा गावडे यांनी तरुणांना रोजगार निर्माण करण्याची दिशा दाखवली आहे.
अण्णा गावडे हे प्रत्येक हंगामात तीन वेगळे व्यवसाय करतात. हिवाळ्यात ते ब्लँकेटची विक्री करतात, पावसाळ्यात स्वीट कॉर्न कणीस विक्री करतात तर उन्हाळ्यात ते रसवंतीगृहाचा व्यवसाय करतात. आपल्या व्यावसायात नाविन्याची भर टाकण्यासाठी ते नेहमी विविध भागात फिरून माहिती घेतात. दिल्लीतील सदर बाजारात फिरताना त्यांनी रसवंतीगृहाचा अभिनव प्रयोग पाहिला. तो पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात मोबाईल रसवंतीगृह करण्याचा विचार आला. त्याने लगेचच डिझेल इंजिन घेऊन हे फिरते रसवंतीगृह तयार केले. यात चाकापासून ते बसायच्या सीटपर्यंत सर्वच गोष्टींची आखणी त्यांची स्वत:केली आहे. गावडे यांची रसवंतीगृहाची गाडी ते दररोज घरापासून व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत चालवत आणतात, विविध ठिकाणी गाडी लावून ते उसाचा रस तयार करुन ग्राहकांना देतात. या रसामध्ये आले, लिंबाचा रस आदी मिश्रण असल्याने या उसाच्या रसाची चव काही न्यारीच असते.