पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांमध्ये ७८ रूग्णांची भर; ४९ रुग्ण अत्यवस्थ तर ११ रुग्णांना सोडले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 09:24 PM2020-04-27T21:24:52+5:302020-04-27T21:35:46+5:30
शहरात सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून हे तिघेही ससून रुग्णालयात उपचार घेत होते.
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी ७८ ने वाढला असून शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १२१७ वर पोचली आहे. दिवसभरात एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोणावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या अकरा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ४९ रुग्ण मात्र अत्यवस्थ आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठपर्यंत शहरात नव्याने ७८ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली. या रुग्णांपैकी ससून रूग्णालयात १४, नायडू रुग्णालयात ५३ तर खासगी रुग्णालयांमध्ये ११ रुग्ण दाखल आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४९ जणांची प्रकृती चिंताजनक असून यापैकी ससून रूग्णालयात ३०, डॉ. नायडू रुग्णालयातील तीन तर अन्य खासगी रुग्णालयांमधील १६ रुग्णांचा समावेश आहे.
शहरात सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून हे तिघेही ससून रुग्णालयात उपचार घेत होते. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७५ झाली आहे. एकूण ११ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या १७६ झाली आहे.
----------
पालिकेने घरोघर सर्वेक्षण सुरू केलेले आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकांची संख्या ९९२ पर्यंत वाढविण्यात आली असून १६ मार्चपासून आतापर्यंत ५० लाख ६२ हजार ४५७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १५ लाख ४४ हजार ३७५ घरापर्यंत पालिकेची ही पथके पोचली आहेत.
------------