पश्चिम घाटाच्या गवतांमध्ये नवीन प्रजातीची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:46+5:302021-05-24T04:09:46+5:30
- ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ असे नामकरण- आघारकर संस्थेतील शास्त्रज्ञांचा शोध पुणे : इस्चिमम गवताच्या सुमारे ८१ पैकी ६१ प्रजाती भारतात ...
- ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ असे नामकरण- आघारकर संस्थेतील शास्त्रज्ञांचा शोध
पुणे : इस्चिमम गवताच्या सुमारे ८१ पैकी ६१ प्रजाती भारतात आहेत. त्यातील ७० टक्के तर पश्चिम घाटातच आढळतात. ‘इस्चिमम’ला मुरैना गवत असे म्हटले जाते. या सर्व प्रदेशनिष्ठ असून, त्यामुळे आपला पश्चिम घाट गवताच्या बाबतीतही संपन्न आहे. त्यातच आता ‘इस्चिमम आंबोलीएन्स’या नव्या गवताच्या प्रजातीचा समावेश झाला आहे. आंबोलीत अनेक वनस्पतींच्या, सापांच्या प्रजाती समोर आल्या, पण आंबोली नाव पहिल्यांदाच देण्यात आले आहे, अशी माहिती आघारकर संशोधन संस्थेचे वनस्पती संशोधक डॉ. मंदार दातार यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गवताची नवीन प्रजाती आढळली आहे. इस्चिमम आंबोलीएन्स’ असे त्याने नामकरण केले आहे. आघारकर संशोधन संस्थेतील डॉ. मंदार दातार डॉ. रितेशकुमार, चौधरी, डॉ. शुभदा ताम्हनकर, सारंग बोकील या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला आहे.
‘इस्चिमम आंबेालीएन्स’हे गवत आंबोली घाटाच्या पायथ्याशी एका ओढ्यामध्ये दिसले. त्याचा प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नुकताच प्रसिध्द झाला आहे. दातार म्हणाले, ‘‘२०१७ पासून आम्ही पश्चिम घाट, गोवा, कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर येथून गवताचे नमुने गोळा केले. त्यांचा डीएनए तपासला. वंशावळ पाहिली. त्यात दोन नव्या प्रजाती समेार आल्या. त्यातील एकाला गोव्याच्या पठारावर गवत आढळल्याने डॉ. जनार्धमन यांचे नाव दिले, तर दुसरी प्रजाती आंबोलीत सापडल्याने त्या गावाचे नाव दिले.’’
—————————
नवीन वनस्पतींच्या यादीत समावेश
नवीन वनस्पतींच्या यादीत समावेश ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ या गवताचे परागीभवन वाऱ्याने होते. परंतु, आम्ही शोधलेली प्रजाती सध्या सर्वत्र दिसत नाही. आम्ही त्याची लागवड करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गेल्या वर्षी आघारकर संस्थेतर्फे आम्ही १८१ फक्त सह्याद्रीमधेच प्रदेशनिष्ठ असणाऱ्या वनस्पतींची एक यादी प्रकाशित केली. या १८१ वनस्पती आपला महत्त्वाचा नैसर्गिक वारसा आहेत. त्यामध्ये आता या आंबोलीतील गवताचे समावेश झाला आहे, असे डॉ. दातार यांनी सांगितले.
————————-
दूधउत्पादनासाठी गवत महत्त्वाचे
खाद्य गवतांच्या जातीपैकी पवन्या, मारवेल हे गवत अत्यंत आवश्यक आहे. भारतीय उपखंड या गवतांनी समृध्द आहे. ही दोन्ही गवते दूधउत्पादनासाठी चांगली आहेत. पण अनेकदा मारवेलला फुले येऊन त्याच्या बिया होण्यापूर्वीच जनावरे खातात. त्यामुळे त्यांचे परागीभवन होत नाही. म्हणून त्याविषयी जनजागृती व्हायला हवी. बिया होऊन खाली पडल्यानंतर ते गवत खाण्यासाठी मोकळे केले पाहिजे. तरच त्याचे परागीभवन होईल.
- डॉ. मंदार दातार , वनस्पती शास्त्रज्ञ, आघारकर संशोधन संस्था, पुणे
———————————-