पुण्यात नगरसेवकांची लायकी काढणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांच्या कानशिलात भडकावली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 05:27 PM2019-02-11T17:27:21+5:302019-02-11T18:14:13+5:30
राजकीय पक्षाचे आंदोलन सुरु असताना स्पष्टीकरण द्यायला आलेल्या अतिरिक्त आयुक्तांशी झालेल्या वादाची परिणीती मारहाणीत झाली आहे.
पुणे : राजकीय पक्षाचे आंदोलन सुरु असताना स्पष्टीकरण द्यायला आलेल्या अतिरिक्त आयुक्तांशी झालेल्या वादाची परिणीती मारहाणीत झाली आहे. विशेष म्हणजे महापौर मुक्ता टिळक यांच्या समोरच हा प्रकार घडल्याने पुणे महापालिकेत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नदीमधील जलपर्णी काढण्याच्या निविदेचा विषय गेले काही दिवस चर्चेत आहे.या विषयावरून महापौरांच्या दालनासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनानंतर सुरु असलेल्या चर्चेत स्पष्टीकरण देण्यासाठीअतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर दालनात आले. मात्र ज्यांचा निविदा प्रक्रियेत समावेश होता त्यांनी स्पष्टीकरण देऊ नये अशी नगरसेवकांची मागणी होती.त्यावेळी सुरु असलेल्या चर्चेत 'अधिकारी चोर आहेत', असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी 'असे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे', असे सुनावले. यामुळे नगरसेवक संतप्त झाले.
तुम्ही आमची लायकी काढणारे कोण, असे म्हणत निंबाळकर यांना जाब विचारू लागले. त्यावेळी येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्याने निंबाळकर यांच्या श्रीमुखात भडकवली. अचानक हा प्रकार घडल्याने ;गोंधळ उडाला असून सुरक्षा रक्षकांनी निंबाळकर यांना दालनाबाहेर काढले. सध्या महापालिकेत गोंधळाचे वातावरण असून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.