अतिरिक्त आयुक्त, तुम्ही सभागृहाबाहेर जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 05:16 AM2017-07-20T05:16:28+5:302017-07-20T05:16:28+5:30
महापालिका शाळेतील मुलांना बसण्यासाठी बाकडे नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन स्थायी समितीने शिक्षण विभागाची जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिका शाळेतील मुलांना बसण्यासाठी बाकडे नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन स्थायी समितीने शिक्षण विभागाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. किती शाळांना भेटी दिल्या याबाबत उत्तर न देऊ शकणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांना सभागृहाबाहेर जा, असा आदेश दिला. मात्र, आयुक्तांनी मध्यस्ती केल्याने सदस्य शांत झाले. आठ दिवसांत वस्तुस्थितीची माहिती देण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे नाहीत, स्वच्छतागृह नाही, पिण्यासाठी पाणी नाही, अनेक शाळेत शिक्षकांची वाणवा आहे. शाळांना मुख्याध्यापक नाहीत. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घसरत आहे, याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याबाबत मागील आठवड्यातील स्थायी समिती सभेत चर्चा झाली होती. अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी शाळांना भेऊ देऊन उपाययोजना करण्याचे सूचना स्थायी समितीनी केली होती. त्या वेळी मी आज शाळांना भेटी दिल्यावर उद्या समस्या सुटणार का? असे उलट उत्तर त्यांनी दिले होते. या असंवेदनशील पणाचा निषेध पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या.
बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत पुन्हा या विषयांवर चर्चा झाली. स्थायी समिती सभेत अतिरिक्त आयुक्तांना आपण किती शाळांना भेटी दिल्या अशी विचारणा केली. त्यावर भेट न दिल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत व्यवस्थित उत्तरे दिले नाहीत. त्यामुळे स्थायी समितीने अतिरिक्त आयुक्तांना सभागृहाबाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मध्यस्थी केली. महापालिका शाळेत किती शिक्षकांची कमतरता आहे. याचा अहवाल ८ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले. तसेच अतिरिक्त आयुक्तांनी स्थायी समितीच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, असे सावळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची हेळसांड खपवून घेणार नाही
लोकमतमध्ये काही दिवसांपूर्वी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. असे वृत्त छायाचित्रासह प्रकाशित केले होते. याबाबत मागील सभेत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. त्यांना उत्तरे देता आली नाही. या विभागाची जबाबदारी असणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांना उत्तरे देता आली नाही. अत्यंत असंवेदनशीलपणे, बेजबाबदारपणे उत्तरे दिली. पालिकेच्या शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. त्या मुलांची हेळसांड करू नये. त्यांच्याकडे आस्थेवाईकपणे पाहणे गरजेचे आहे. सर्व सोयीसुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, असे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले.