आपत्ती व्यवस्थापनावर अतिरिक्त कार्यभाराची आपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:17 AM2018-06-19T01:17:43+5:302018-06-19T01:17:43+5:30

आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या खातेप्रमुखांवर क्षेत्रीय कार्यालय, तसेच वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यसचिवपदाची जबाबदारी टाकून महापालिका प्रशासनाने आपल्या व्यवस्थापनाचे कसब पुणेकरांना दाखवले आहे.

Additional workplace disaster on disaster management | आपत्ती व्यवस्थापनावर अतिरिक्त कार्यभाराची आपत्ती

आपत्ती व्यवस्थापनावर अतिरिक्त कार्यभाराची आपत्ती

Next

- राजू इनामदार 
पुणे : आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या खातेप्रमुखांवर क्षेत्रीय कार्यालय, तसेच वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यसचिवपदाची जबाबदारी टाकून महापालिका प्रशासनाने आपल्या व्यवस्थापनाचे कसब पुणेकरांना दाखवले आहे. ही तिन्ही कामे एकाच अधिकाऱ्याने सांभाळावीत, अशी प्रशासनाची अपेक्षा असल्याने कोणत्याही कामाला न्याय मिळेना, अशी स्थिती झाली आहे.
पावसाळ्याच्या काळात आपत्ती व्यवस्थापन हा महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाचा विभाग होतो. आपत्तीसदृश परिस्थिती रोज निर्माण होत नसली तरीही या विभागाला कायम सज्ज राहावे लागते. आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा लागतो. त्यात आपत्ती निवारणाकरिता उपयोगी पडू शकतील, अशा प्रत्येक खात्याची, खातेप्रमुखाची अद्ययावत माहिती ठेवावी लागते. प्रसंगी बाहेरून कुठून मदत येईल तेही पाहावे लागते. प्रत्येक खातेप्रमुखाबरोबर संपर्क ठेवावा लागतो. एखादा प्रसंग उद््भवला तर त्यात सापडलेल्यांची सुटका करण्यापासून ते त्यांना तात्पुरता निवारा उभा करून देण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची तयारी ठेवावी लागते.
या विभागाचे हे महत्त्व ओळखूनच महापालिकेने आपत्ती निवारण अधिकारी या स्वतंत्र पदाची निर्मिती करून त्या पदावर नियुक्ती केली आहे. मात्र आता त्या अधिकाºयाकडे वारंवार वेगवेगळ्या पदांचा कार्यभार सोपवला जात आहे. यापूर्वी त्यांच्याकडे मुख्य समाजविकास अधिकारी खात्याचा कार्यभार देण्यात आला होता. तो बराच काळ त्यांच्याकडेच होता. त्यानंतर आता वारजे माळवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याशिवाय मध्यंतरी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे राज्य सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आलेले सदस्य सचिव निवृत्त झाले. त्याबरोबर लगेचच त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार आपत्ती व्यवस्थापन अधिकाºयांकडे देण्यात आला आहे.
म्हणजे आपत्ती व्यवस्थापनसारख्या महत्त्वाच्या पदावरील अधिकाºयाला पूर्णवेळ तेच काम करू देण्याऐवजी महापालिका प्रशासनाकडून त्यांच्याकडे सातत्याने वेगवेगळ्या पदांची पूर्णवेळ घेणारी जबाबदारी टाकण्यात येत आहे. ४ प्रभाग, त्यांचे १६ नगरसेवक व प्रत्येक विभागाचे अधिकारी, रोजंदारी कर्मचारी असे मिळून सुमारे ५०० पर्यंतचे कर्मचारी अशी एक लहान महापालिका म्हणजे क्षेत्रीय कार्यालय असते. तिथे कायम उपस्थित राहणे गरजेचे असते. वारजे माळवाडी क्षेत्रीय कार्यालय महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून बरेच लांब आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्यालय महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आहे आणि आता सदस्य सचिव म्हणून पुन्हा एक अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीचे कार्यालय घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या नव्या इमारतीमध्ये आहे.
>व्यवस्थापन अधिकारीपद : सदैव तत्पर, तारेवरची कसरत
तीन ठिकाणी अशी तीन कार्यालये असलेले आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे एकमेव पद महापालिकेत आहे. या तिन्हीपैकी जिथे काम असेल तिथे जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांवर स्वाक्षºया आणण्याचे काम त्या त्या कार्यालयातील अधिकाºयांना करावे लागते. आपत्ती व्यवस्थापन विभागाला पावसाळ्याच्या पूर्वकाळात, पावसाळा सुरू झाल्यावर व पावसाळा संपल्यानंतरही बºयाच काळापर्यंत काम असते. अग्निशमन दलाला जसे कायम सज्ज राहावे लागते, तसे या विभागाला या काळात सतत सतर्क राहावेच लागते. पाऊस किती पडतो, कुठे पडतो आहे, धरणातून पाणी सोडणार आहे, सोडणार असतील तर ते किती वेगाने सोडणार आहे, त्यामुळे नदीला, कालव्याला फुगवटा येईल का, त्याच्या आसपासच्या वसाहतींना धोका निर्माण होईल का, याबाबतची माहिती या विभागाला सातत्याने घेत राहावे लागते. असे असूनही या खात्याच्या प्रमुखांकडे गेली काही वर्षे सातत्याने दुसºया, बरेच काम असलेल्या विभागांचा अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. वृक्ष प्राधिकरण समितीची दर ४५ दिवसांच्या आत बैठक आयोजित करण्याचे, वृक्षतोडीसाठी आलेल्या प्रकरणांची सविस्तर फाईल तयार करून ती समितीसमोर ठेवण्याचे, गरज असेल तर प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करण्याचे अशा अनेक कामांची जबाबदारी सदस्य सचिवांवर आहे. क्षेत्रीय कार्यालयप्रमुख म्हणून काम करताना या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखांना आता हे सदस्यसचिवपदाचे अतिरिक्त कामही करावे लागणार आहे. या जबाबदाºयांमुळे सध्या त्यांना मूळ कामापेक्षाही वेळेच्या व्यवस्थापनाचेच काम जास्त करावे लागणार आहे.

Web Title: Additional workplace disaster on disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.