स्थानिकांच्या तक्रारीची दखल; सूस रस्त्यावरील कचऱ्यापासून सीएनजी बनविण्याचा प्रकल्प स्थलांतरित
By राजू हिंगे | Published: January 4, 2024 07:09 PM2024-01-04T19:09:56+5:302024-01-04T19:10:14+5:30
सूस रस्त्यावर असलेल्या प्रकल्प परिसरात लोकवस्ती वाढली असून, याठिकाणी कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे
पुणे : ओल्या कचऱ्यापासून सीएनजी तयार करण्यासाठी सुमारे २०० टन क्षमतेचा प्रकल्प २०१७ मध्ये महापालिकेने पाषाण-सूस रस्त्यावर उभारला. पण, आता प्रकल्पाबाबत स्थानिकांकडून तक्रारी वाढत असल्याने हा प्रकल्प स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएच्या हद्दीतील नांदे-चांदे गाव हद्दीतील जागेत तो उभारला जाणार आहे.
सूस रस्त्यावर असलेल्या प्रकल्प परिसरात लोकवस्ती वाढली असून, याठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे हा प्रकल्प स्थलांतरित करावा, या मागणीसाठी सोसायटींनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली होती. त्यानंतर लवादाने हा प्रकल्प स्थलांतरित करण्याचे आदेश दिले.
मात्र, महापालिकेने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी सुरू असली, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी वारंवार मागणी केली आहे. त्यानंतर अखेर पालिकेने जागा निश्चित करून प्रकल्प स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
बफर झोन परिसरात कचरा प्रकल्प
सूस रस्त्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाशेजारीच एक नवीन बांधकाम प्रकल्प उभा राहात आहे. त्यामुळे प्रकल्पाला विरोध होत असल्याने महापालिकेकडून त्याच परिसरात जागा शोधली जात होती. ही जागा नांदे-चांदे गाव हद्दीत असून, ती कचरा प्रकल्पासाठी आहे तसेच तो परिसर बफर झोन आहे. अद्याप या भागात बांधकामे झालेली नसल्याने महापालिकेने विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हा प्रशासनाला हा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार, ही जागा अंतिम करण्यात आली आहे.
तीन महिन्यांत प्रकल्प स्थलांतरित होणार
प्रकल्प स्थलांतरित केला जाणार असून, दोन महिन्यांत स्थापत्यविषयक कामे करून त्यानंतर उर्वरित यंत्र सामग्री बसवली जाणार आहे. नांदे-चांदे या गावात तीन महिन्यांत हा प्रकल्प स्थलांतरित होणार आहे.