Pune Police: ट्विटरच्या तक्रारीची दखल; लिफ्ट मागून तरुणीचा विनयभंग, नराधमाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 09:40 AM2023-07-14T09:40:42+5:302023-07-14T09:41:01+5:30
नराधम आजारी असल्याचा बहाणा करून मुलींकडून लिफ्ट घेत तरुणींचा विनयभंग करत असे
पुणे : आजारी असल्याचा बहाणा करून पादचारी मुलीस स्वत:च्या गाडीवरून पुढे सोडण्यास सांगून अश्लील चाळे करणाऱ्या सदाशिव पेठेतील एकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी त्यांचा मोबाइल नंबर सार्वजनिक केला होता. त्यावर आलेल्या मेसेजची दखल घेऊन पोलिसांनी काही तासांत या नराधमाला अटक केली.
अनुप प्रकाश वाणी (वय ४४, रा. शनिवार पेठ) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ६ जुलै रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी तरुणी व तिची मैत्रीण सेनापती बापट रोडने बालभारती इमारतीसमोरून सायकल घेऊन पायी जात होत्या. यावेळी एकजण दुचाकीवरून आला. मला चक्कर येत आहे, तुम्ही माझ्याच दुचाकीवरून पुढे सोडा, अशी विनवणी केली. माणुसकीच्या नात्याने तरुणीने त्यास मदत करण्यासाठी त्याची गाडी घेतली. तो पाठीमागे बसला होता. काही अंतरावर गेल्यावर त्याने तरुणीच्या अंगाला स्पर्श करण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला बऱ्याच वेळा सांगितले, तरीही त्याचा स्पर्श वाढत होता. तिला भीती वाटल्याने तिने गाडी थांबवून मुलांची मदत मागितली. तोपर्यंत फिर्यादीची मैत्रीण सायकलवरून तेथे आली. तो गाडी घेऊन पळून गेला.
दरम्यान, याबाबत पुणे पोलिसांना या तरुणीचा मेसेज मिळाला. चतु:श्रृंगी पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून व दुचाकीच्या क्रमांकावरून आरोपीचा माग काढला. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, आजारी असल्याचा बहाणा करून मुलींकडून लिफ्ट घ्यायचा बहाणा करून तो तरुणींचा विनयभंग करत असे. अशा अनेक घटना शिवाजीनगर, डेक्कन, अलंकार, चतु:श्रृंगी परिसरात केल्याची कबुली वाणी याने दिली आहे. याची माहिती मिळाल्याने अनेक पीडित मुली तक्रार देण्यासाठी समोर येत आहेत. अशा प्रकारची घटना कोणासोबत घडली असेल तर त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.