कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडे पुरेशी साधनसामुग्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 09:51 PM2021-03-31T21:51:43+5:302021-03-31T21:52:06+5:30
अंत्यसंस्कार करणाऱ्या सेवकांना महापालिकेने आत्तापर्यंत ७ हजार ४१७ पीपीई किट, १२ हजार ५१२ हॅण्ड ग्लोज, १ हजार ८९५ एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क व सॅनिटायझर पुरविले आहेत.
पुणे : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुणे महापालिकेला शहरातील स्वयंसेवी संस्थांची मोठी मदत झाली. सहा- सात संस्थांचे प्रत्येकी २० ते २५ प्रतिनिधी याकरिता गेली वर्षभर शहरातील विविध स्मशानभूमीत, दफनभूमीत कार्यरत आहेत.
सदर सेवकांना महापालिकेने आत्तापर्यंत ७ हजार ४१७ पीपीई किट, १२ हजार ५१२ हॅण्ड ग्लोज, १ हजार ८९५ एन-९५ मास्क, सर्जिकल मास्क व सॅनिटायझर पुरविले आहेत. तसेच या संस्थांनाही अनेकांना शहरात स्वत:हून या साहित्यांचा पुरवठा केला आहे. यामुळे शहरात कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तींनाही आजपर्यंत कोरोना संरक्षण किटचा पुरवठा कमी झाल्याची तक्रार आलेली नाही.
पुणे महापालिका आपल्या तथा शासनाच्या शववाहिकेतून कोरोनाबाधितांचे मृतदेह स्मशानभूमी अथवा दफनभूमीपर्यंत पोहचविताना, सदर शववाहिकेतील चालक व सहकाऱ्याला प्रत्येक वेळी नवे पीपीई किट वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातून हे पीपीई किट शववाहिका चालकांनी दररोज घ्यावेत अशा सूचनाच आरोग्य विभागाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत. यामुळे दिवसाला साधारणत: १५० पीपीई किट शहरात अत्यंविधीसाठी वापरले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
--------------
शहरातील एकूण कोरोनाबाधित संख्या - २ लाख ६९ हजार ३४३
बरे झालेले रूग्ण - २ लाख ३० हजार १८३
उपचार सुरू -३० हजार ८५८
कोरोनाबळी -५ हजार ३०२
------------------
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हाताळताना संबंधित व्यक्तींना पीपीई किटचा पुरवठा वेळेत होईल याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली आहे़ या कामात स्वयंसेवी संस्थांचाही मोठा पुढाकार राहिला आहे.
डॉ.कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे मनपा.
--------------