जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:49+5:302021-04-02T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच ऑक्सिजनच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच ऑक्सिजनच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांच्यासोबत बैठकीनंतर चाकण येथील एअर लिक्विड ऑक्सिजन कंपनीत जाऊन प्रत्यक्ष आढावा घेतला.
कोविड रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात १३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून, उत्पादकांकडे ७९० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. परंतु पुण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करावी. जेणेकरुन भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही. याबाबत डॉ. देशमुख यांनी उत्पादकांच्या अडचणी जाणून उपाययोजनांबाबत चर्चा केली.
-----
चाकण येथील एअर लिक्विड कंपनीत दररोज सर्वाधिक १२० टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. या कंपनीत सध्या पूर्ण क्षमतेने उत्पादन घेतले जात आहे. तसेच, आवश्यक प्रमाणात पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी