सूर्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य मिशन’
By Admin | Published: August 2, 2015 04:38 AM2015-08-02T04:38:38+5:302015-08-02T04:38:38+5:30
‘चांद्रयान २’ ही मोहीम फत्ते झाल्यानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य मिशन’ राबविण्यात येणार आहे. त्याला केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे आणि त्याचे कामही सुरू झाले आहे.
पुणे : ‘चांद्रयान २’ ही मोहीम फत्ते झाल्यानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य मिशन’ राबविण्यात येणार आहे. त्याला केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे आणि त्याचे कामही सुरू झाले आहे. हे यान पृथ्वीपासून एका ठराविक अंतरावर जाऊन तेथे थांबून सातत्याने सूर्याचा अभ्यास करणार आहे, अशी माहिती ‘मंगळयान’ मोहिमेचे प्रमुख डॉ. सुब्बय्या अरुणन यांनी दिली.
डॉ. अरुणन एका कार्यक्रमासाठी शनिवारी पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आदित्य मिशन’मुळे सूर्याचा सखोल अभ्यास केला जाईल. त्यातून सूर्याबाबतच्या अनेक प्रश्नांचा उलगडा होईल, असे सांगत अरुणन म्हणाले, की ‘चांद्रयान १’ मोहिमेच्या यशानंतर २०१७ मध्ये भारताकडून ‘चांद्रयान २’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. यानाला पृथ्वीवरून पाठविण्यासाठी आणि चंद्राच्या पृष्ठभागावर हळूवारपणे उतरण्यासाठी विशेष इंजिनची आवश्यकता असते. तसे अत्याधुनिक, पूर्णपणे भारतीय बनावटीचे इंजिन बनविण्याचे काम प्रगतिपथावर आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल.
मंगळयान मोहिमेच्या पुढील आव्हानाबाबत ते म्हणाले, की आता मंगळयान हे पृथ्वीपासून सर्वाधिक लांब आहे. सध्या ते पृथ्वीपासून ३०९० मिलियन किमी दूर आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये ते लांबीचा टप्पा गाठणार आहे. त्यानंतर या यानाचे अंतर पुन्हा कमी करणे हे आव्हान आमच्यासमोर आहे. त्याबरोबर पुढील काळात यान सूर्यापासून लांब जाणार आहे. त्यामुळे यानाला ऊर्जा मिळणे कठीण होईल आणि त्यावर काम करणे हे आव्हानात्मक आहे. (प्रतिनिधी)
‘चांद्रयान २’ मोहीम आमच्यासाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेअंतर्गत आम्ही चंद्रावर यान-बग्गी उतरविणार आहोत. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेसाठी यानाला एक वैशिष्ट्यपूर्ण इंजिनची आवश्यकता आहे. जे पृथ्वीवरून वेगाने हवेत झेपावेल आणि चंद्राच्या वातावरणात पोहोचल्यानंतर हळुवारपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. या दोन्ही गोष्टी एकाच इंजिनमध्ये आणणे अवघड आहे. असे इंजिन बनविण्याचे काम इस्रोमध्ये सुरू असून, लवकरच ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
‘मंगळयाना’च्या पुढच्या टप्प्याबाबत डॉ. अरूणन म्हणाले, की मंगळयानाच्या आणि पृथ्वीच्या मधोमध सूर्य असल्याने गेले २ महिने यान अॅटोमेशन प्रोगामवर ठेवण्यात आले होते. दोन महिन्यानंतर यानाचे इंजिन पुन्हा सुरू करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आणि यान पुन्हा सुरू झाले. या दोन महिन्यांत या यानाने मंगळ ग्रहाची टिपलेली छायाचित्रे आणि इतर माहिती घेण्याचे काम सुरू आहे.