युपीएससी नागरी सेवा परीक्षेत आदित्य श्रीवास्तव पहिला; १ हजार १६ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर
By प्रशांत बिडवे | Published: April 16, 2024 03:56 PM2024-04-16T15:56:45+5:302024-04-16T16:07:00+5:30
आदित्य श्रीवास्तव याने भारतात पहिला क्रमांक पटकाविला आहे...
पुणे : केंद्रीय लाेकसेवा आयाेगाने नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल मंगळवार दि. १६ राेजी जाहीर केला. युपीएससीच्या संकेतस्थळावर निवड झालेल्या १ हजार १६ उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिध्द केली. त्यामध्ये आदित्य श्रीवास्तव याने भारतात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तसेच अनिमेष प्रधान दुसरे आणि दाेनुरू अनन्या रेड्डी यांनी तिसरे स्थान पटकाविले आहे.
युपीएससीतर्फे नागरी सेवा परीक्षा अंतर्गत सप्टेंबर २०२३ मध्ये लेखी परीक्षेचे आयाेजन केले हाेते. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या हाेत्या. परीक्षेत प्राप्त गुणांनुसार गुणवत्ता यादी युपीएसीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये १ हजार १६ उमेदवारांचा समावेश आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पाेलीस सेवा (आयपीएस) यासह केंद्रीय सेवा वर्ग १ आणि वर्ग २ साठी निवड हाेणार आहे.
उमेदवारांना https://upsc.gov.in/ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत उमेदवारांना प्राप्त गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे आयाेगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिलांमध्ये दाेनुरू अनन्या रेड्डी प्रथम
युपीएससीच्या गुणवत्ता यांदीत पहिल्या दहा उमेदवारांमध्ये चार महिला उमेदवारांचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या दाेनुरू अनन्या रेड्डी या महिला उमेदवारांमध्ये प्रथम आल्या आहेत. त्या पाठाेपाठ चाैथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे रूहानी आणि सृष्टी डबास तर नाैशीन यांनी नववे स्थान पटकाविले आहे.